पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३३०
 

करी पंथाची दीक्षा देण्याचे प्रारंभीचे कार्य नामदेवांनी केले यात शंका नाही.
 त्यांच्या नंतर दोनशे वर्षे त्यांच्यासारखा समर्थ वारकरी झाला नाही. पण सुदैवाने ते कार्य पुढे चालविण्यास एकनाथांसारखा थोर वाग्मी वारकरी पंथाला लाभला. त्यांच्या पाठोपाठ तुकाराम आले व त्यांनी या मंदिरावर कळस चढविला. आणि 'विठ्ठल विठ्ठल गजरी' ने केवळ पंढरीच नव्हे, तर अवघी महाराष्ट्रभूमी दुमदुमून टाकली.
 महाराष्ट्र महाराष्ट्र झाला, येथला समाज एकरूप झाला, याचे बरेचसे श्रेय याप्रमाणे वारकरी पंथाला आहे.

(४) एक परंपरा
 एक धर्म व एक दैवत यांच्याप्रमाणेच एक प्राचीन परंपरा आणि एक भाषा यांचाही समाज एकरूप करण्यास उपयोग होतो. संतांनी वेद, उपनिषदे, महाभारत, गीता, रामायण यांची परंपरा अतूट, अखंड राखण्याचा, या परंपरेचा अभिमान जागृत ठेवण्याचा सतत प्रयत्न केलेला दिसतो. त्यांनी जो भागवत धर्म सांगितला तो प्रामुख्याने भगवद्गीता आणि भागवत पुराण यांच्या आधारे सांगितला आणि तसे करीत असताना वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण, व्यास, वाल्मिकी, ध्रुव, हरिश्चंद्र यांच्याविषयीचा पूज्यभाव ठायी ठायी प्रगट केला.

वेद-उपनिषदे
 ज्ञानेश्वरीच्या आरंभीच ज्ञानेश्वरांनी महाभारत आणि व्यास यांचा, आपली सर्व शब्दशक्ती पणाला लावून गौरव केला आहे. 'महाभारत म्हणजे सर्व काव्यांचा राजा, ग्रंथगौरवाचे पीठ आहे. या ग्रंथामुळे चातुर्य शहाणे झाले, आणि सुखाचे सौभाग्य पुष्ट झाले. सूर्याच्या तेजामुळे विश्व जसे धवळते तसे व्यासमतीमुळे त्रैलोक्य उजळले आहे.' पुढील विवेचनात वेद व उपनिषदे यांचा मधून मधून असाच गौरव त्यांनी केला आहे. प्राचीन परंपरेविषयी नामदेवांचाही हाच भाव आहे. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य सांगताना वेदांनी हा निर्धार केला आहे, हा वेदांचा विवेक आहे, असे ते म्हणतात. रामनामाचा जप करा हे सांगताना नामदेव म्हणतात की हे उपनिषदांचे सार मी तुम्हांला सांगतो आहे. सर्वाभूती विठ्ठल आहे, हे वेदीचे वचन आहे. ब्राह्मण हे स्वधर्मापासून भ्रष्ट झाले अशी टीका करून, त्यांनी वेदपरायण असणे, हे खऱ्या ब्राह्मणाचे लक्षण म्हणून सांगितले आहे. त्यांनी षट्कर्मे आचरली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. 'वेदांचे महिमान', 'समर्थ वेद तो आमुचा' असा वेदाभिमान ते ठायी ठायी प्रगट करतात.
 एकनाथांनी जो भागवत धर्म सांगितला तो भागवताच्या आधारे सांगितला. पण ही भक्ती वेदोक्त आहे, असे ते आवर्जून सांगतात. भागवताधारे जसा त्यांनी कृष्णमहिमा वर्णिला तसाच भावार्थ रामायणाच्या आधारे राममहिमा गायिला. भागवताच्या