पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२७
संतकार्य-चिकित्सा
 

र्जून सांगितलेले असते. ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णांनी सदाशिवाचा अतिशय गौरव केलेला आढळतो (अध्याय १२-२१६). तेथे सदाशिव माझी भक्ती करतो, असे श्रीकृष्णाच्या तोंडी वचन आहे. उलट एका अभंगात, ज्ञानेश्वरांनी, 'विठ्ठलाने महेशाला मस्तकी वंदिले' असे म्हटले आहे. आणि 'सदाशिवाचा पांडुरंग निजठेवा' असेही दुसऱ्या अभंगात म्हटले आहे (सकल संत गाथा, जोशी प्रत, पृ. १०, ११). 'बाप रखुमा देवी वरू, ज्योतिलिंग विश्वनाथ । तेणे माझा मनोरथ, पुरविला गे माये ॥' हा ज्ञानेश्वरांचा अभंग प्रसिद्धच आहे.
 पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मस्तकावर जो मुकुट आहे तो खरा मुकुट नसून शंकराची पिंडी आहे, हा जो वरील अभंगाचा भावार्थ, तो सर्व संतांना मान्य आहे. 'विष्णुसहित शिव आणिला पंढरी, केले भीमातीरी देखणे तेणे ।' असे निवृत्तिनाथांनी, पुंडलिकाचा गौरव करताना, स्पष्टच म्हटले आहे. पांडुरंग हे मूळ नाव शंकराचे असून, कानडीत त्याचे पंडरंगे असे रूप होते. त्यावरूनच पुढे पंढरपूर, पंढरपूर हे नाव झाले, असे डॉ. भांडारकर म्हणतात. विठ्ठल हा मूळ कानडी देव याविषयी सर्व संताचे एकमत आहे. एकनाथांनी तर, 'तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र कानडे पंढरीये, विठ्ठल कानडा विटेवरी', असे म्हणून वादाला जागा ठेवलीच नाही. 'विठ्ठल कानडे बोलू जागे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥' असे नामदेव म्हणतात. 'कानडा विठ्ठल कर्नाटकु ।' असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. आणि कर्नाटकातून आलेला हा विठ्ठल शिवमस्तकी धारण करणारा होता, असे अनेक संशोधकांचे मत आहे.

शिव-विष्णू
 शिव, विष्णू, विठ्ठल, कृष्ण, राम या सर्वांत संत अभेद मानीत असत एवढाच याचा भावार्थ. 'नामा म्हणे शिव विष्णू एकरूप । ताराया अमूप अवतार ॥' असे नामदेव म्हणतात. एका अभंगात तर, विष्णूचे भजन करून मनुष्य जर शिवापासून दूर जाईल, तर त्याचा अधःपात होईल असे सांगून, भेद मानणाऱ्यांची त्यांनी निर्भर्त्सना केली आहे. 'शिवपूजा करी, विष्णूसी अव्हेरी । तयाचिये घरी यम नांदे ॥ नामा म्हणे असती शिवविष्णु एक । वेदांचा विवेक आत्माराम ॥' असा वेदांचा आधार त्यांनी दिला आहे.

वेलांटीचा फरक
 'होऊनिया विष्णुभक्त शिवनिंदा जो करीत ।' त्याला एकनाथांनी महामूर्ख म्हटले आहे. आणि 'रमा, रमेश, मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥' असा विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग असल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. 'हरिहरा भेद । नाही, करू नये वाद ॥' असे तुकारामांनीही म्हटले आहे. त्याच अभंगात पुढे ते म्हणतात, दोघांमध्ये एका वेलांटीचा फरक आहे, त्याला काही महत्त्व नाही. 'उजवे वाम भाग ।