पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३२८
 

तुका म्हणे एकचि अंग ॥' डावा व उजवा असा हातापायांत भेद असला तरी, अंग-शरीर-एकच असते. त्याप्रमाणे शिव व विष्णू एकच आहेत.
 नरहरी सोनाराची कथा या दृष्टीने उद्बोधक आहे. तो कट्टर शिवभक्त होता. पंढरीस राहूनही तो विठ्ठलाचे दर्शन घेत नसे. पुढे ज्ञानदेव, नामदेव यांच्या संगतीने त्याच्या मनातला हा भेद मावळला. आणि शेवटी तो म्हणाला, 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा । ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥ धन्य ते संसारी नर आणि नारी । वाचे हर आणि हरी उच्चारिती ॥ नाही पै भेद । अवघा मनी अभेद । द्वेषाद्वेषसंबंध । उरो नेदी ॥ सोनार नरहरी । न देखे द्वैत । अवघा मूर्तिमंत । एकरूप ॥'
 भिन्न देवतांच्या उपासकांत द्वेष कसा असतो आणि तो नाहीसा करण्याला समाज- संघटनेच्या दृष्टीने किती महत्त्व असते ते या कथेवरून कळून येईल. संतांनी हे महत्त्व महाराष्ट्राच्या मनावर कायमचे बिंबवलेले आहे.

(३) सर्वसमावेशक
 पण महाराष्ट्र समाज एकरूप करण्याच्या दृष्टीने, याहीपेक्षा संतांनी केलेले जास्त महत्त्वाचे कार्य म्हणजे निरनिराळ्या धार्मिक संप्रदायांतील भेदभाव नष्ट करून, त्यांचा आपल्या वारकरी संप्रदायात समावेश करून घेऊन, वारकरी संप्रदाय व विठ्ठल हे दैवत यांच्या कक्षेत सर्व महाराष्ट्राला आणले, हे होय. नाथपंथ व दत्तपंथ हे महाराष्ट्रातून नाहीसे झाले असे नव्हे. पण अखिल महाराष्ट्राचा धर्मपंथ कोणता या प्रश्नाचे उत्तर 'वारकरी पंथ ' हेच त्यापुढे ठरून गेले आणि अखिल महाराष्ट्राचे दैवत म्हणजे विठ्ठल हेही त्यापुढे ठरून गेले.

वारकरी पंथ
 वारकरी पंथ हा ज्ञानेश्वरांच्या आधी चारपाचशे वर्षे तरी येथे असावा, असे संशोधकांचे मत आहे. विठ्ठल हे दैवतही पुरातनच आहे. तेव्हा 'ज्ञानदेवे रचिला पाया' याचा अर्थ वारकरी पंथाची त्यांनी स्थापना केली असा नसून त्यांनी त्याला तत्त्वज्ञानाची दृढ बैठक दिली, इतर पंथांच्या तत्त्वज्ञानांशी त्याचा समन्वय साधला, दीनदलितांना त्यात समाविष्ट करून घेतले आणि भक्तियोगाचे स्वरूप निश्चित करून भूतमात्रांची सेवा हे परमोच्च ध्येय त्याच्या डोळ्यापुढे ठेवले असा आहे.

नाथ, दत्त
 नाथपंथ व दत्तसंप्रदाय हे पुरातन धर्मपंथ आहेत. नाथपंथाची स्थापना आदिनाथ म्हणजे स्वतः शंकर यांनीच केली, अशी आख्यायिका आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिले तर ज्ञानेश्वरांच्या आधी साधारण शंभर वर्षे गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असे दिसते. स्वतः ज्ञानेश्वर नाथपंथी होते. त्यांचे थोरले बंधू निवृत्तिनाथ हेच