पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३२६
 

भरले सदा' अशी अध्यात्मविषयाची चर्चा ते करू लागले. 'वाऊगे घरदार, वाऊगा संसार, वाऊगे शरीर नाशिवंत ॥ मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ॥' असे चोख्याची महारी सोयराबाई म्हणू लागली व अशी रचना करू लागली. हा मनोविकास एरवी अशक्यच होता.

प्रतिष्ठा
 चोखा मेळा, बंका, कर्ममेळा यांनी आपल्याला हीन याती केल्याबद्दल फार चीड व्यक्त केली आहे. कर्ममेळा याने तर, 'आमुची केली हीन याती । तुज का न कळे श्रीपती ॥ जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥' अशी तीव्र शब्दांत देवाचीसुद्धा निर्भर्त्सना केली आहे. हे मानसिक बळ, संतांनी त्यांना भक्तिबळाने जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तिच्यामुळेच आले यात शंका नाही.
 सर्व सामाजिक उन्नतीचे एकच लक्षण असते. मानवी मनाला धैर्य, बळ, निष्ठा, काही उच्च विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे, याचेच नाव उन्नती. संतांनी भक्तिमार्गातील समतेचा उपदेश करून, काही मर्यादित प्रमाणात का होईना, हीन यातींना उन्नत केले हे त्यांचे कार्य अगदी अनमोल असे आहे.

(२) एकं सत्
साम्यात् सख्यम् !
 समाज जितका जास्त एकरूप तितकी त्याच्यात एकता जास्त संभवत असा समाज संघटित करणे जास्त सुलभ असते. साम्यात् हि सख्यं भवति । वैषम्यात् नोपपद्यते ॥ हे व्यासवचन प्रसिद्ध आहे. त्या दृष्टीने संतांचे वर्णसमतेचे तत्त्व जितके महत्त्वाचे, तितकेच सर्व देवतांचे त्यांनी प्रतिपादिलेले ऐक्य, हरिहरांतील अभेद हाही महत्त्वाचा आहे. सर्व देव एक आहेत, त्यांची बाह्य रूपे भिन्न असली तरी त्यांतील सत्-तत्त्व एकच आहे, हा सिद्धांत भारतात वेदकालापासून सर्वमान्य झालेला आहे. इंद्र, वरुण, यम, अग्नी, वायू ही त्या एकं सत्-चीच रूपे आहेत, असे ऋग्वेदात म्हटले आहे. असे असले तरी, प्रत्येक देवतेचे भक्त आपापल्या देवतेचा अभिमान धरून पुनः पुन्हा समाजात द्वैत माजविण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून पुनः पुन्हा सर्व देवतांचा अभेद प्रतिपादून, थोर धर्मवेत्ते ते द्वैत नष्ट करून तेथे अद्वैत स्थापिण्याचा प्रयत्न करतात. कारण देवतांचे ऐक्य हे समाजाच्या ऐक्याला फार पोषक असते.

सर्व देव एक
 ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांच्या व त्यांच्या प्रभावळीतल्या इतर संतांच्या रचनांमध्ये, सर्व देव एक आहेत, त्यांत भेद करणे हे पाप आहे, असे आव-