पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३२२
 

मुस्लिम आक्रमणे अकराव्या शतकाच्या प्रारंभापासून सुरू झाली. त्या वेळी जातिभेद आणि अस्पृश्यता फार तीव्र स्वरूपाला गेली होती. त्यामुळे हीन गणलेल्या लोकांना इस्लामची दीक्षा देऊन त्यांचे धर्मांतर करणे मुस्लिमांना फार सुलभ होऊन गेले. अशा वेळी वर्णभेद व जातिभेद यांवर कडक टीका करून, वर्णसमतेचा उपदेश करून, संतांनी सर्व वर्णाना व जातींना मोक्षमार्ग खुला करून दिला नसता, अध्यात्मक्षेत्रात शूद्रांना आणि अस्पृश्यांनाही काही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली नसती तर मुस्लिमांना हिंदूंचे धर्मांतर घडविण्यात मिळाले त्यापेक्षा दसपट यश मिळाले असते.

वेदांची कृपणता
 वेदांमध्ये प्रारंभी वर्णविषमता नव्हती तरी पुढे उत्तर कालीन वेदांनीच ती मान्य केली आणि त्रैवर्णिकांनाच वेदाधिकार आहे असा दंडक घालून दिला. वेदांच्या या कृत्यावर ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीचा समारोप करताना, अठराव्या अध्यायात निर्भयपणे टीका केली आहे. 'वेद हा सर्व दृष्टींनी संपन्न आहे, पण तीनच वर्णांची तो काळजी वाहतो, त्यांनाच फक्त वेदाधिकार देतो, हा त्याचा कृपणपणा आहे. तो दोष नाहीसा करण्यासाठी गीता अवतरली आहे व तिने चारही वर्णांना, सर्व भूतांना, मोक्षमार्ग मोकळा केला आहे.' ज्ञानेश्वरांच्या या वचनांवरून धार्मिक क्षेत्रात त्यांना वर्णविषमता मान्य नव्हती हे स्पष्ट दिसते.

भक्तीचा महिमा
 गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तिसाव्या श्लोकावर टीका करताना ज्ञानेश्वरांनी आपला वर्णभेदाविषयीचा अभिप्राय अगदी स्पष्ट शब्दांत मांडला आहे. 'मनुष्य कोणत्याही वर्णाचा असो. तो भक्ती करीत असेल तर, तो पापयोनीत जन्माला आला असला तरी, त्याने वेदाध्ययन केले नसले तरी, त्याला मी (श्रीकृष्ण) माझ्याइतक्याच योग्यतेचा मानतो.' (ज्ञानेश्वरी, ९ - ४४९). 'म्हणोनि भक्ति गा एथ सरे । (पुरेशी आहे) जाति अप्रमाण । म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे अवघेचि गा अकारण | एथ अर्जुना माझेपण | सार्थक एक ॥' 'समुद्रात टाकलेले मिठाचे कण जसे सर्व एकरूप होऊन जातात तशा माझ्या भक्तीच्या सागरात जाती विरून जातात.'
 गीतेच्या तिसऱ्या अध्यायात 'यज्ञाबरोबरच प्रजा निर्माण करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला की यज्ञ ही तुमची कामधेनू आहे' असा श्लोक आहे (३.१०). त्यातील 'प्रजा' याचा अर्थ 'तीन वर्णाच्या प्रजा' असा शंकराचार्यांनी केला आहे. ज्ञानेश्वरांनी प्रजा याचा अर्थ 'सर्व भूते' असा केला आहे. यावरून दोघांच्या दृष्टिकोनातील फरक सहज ध्यानात येतो. ज्ञानेश्वरांच्या वरील टीकेवरून त्यांना अध्यात्माच्या क्षेत्रात वर्णभेद, जातिभेद, एवढेच नव्हे तर स्पृश्यास्पृश्य भेदही मान्य नव्हते, असे दिसून येईल.