पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१६.
संतकार्य-चिकित्सा
 



 बहामनी कालातील महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा विचार करताना गेल्या प्रकरणात आपण संतांच्या भागवत धर्माचे स्वरूप पाहत होतो. भक्तियोग, स्वधर्माचरण अशा त्याच्या चारपाच लक्षणांचा विचार तेथे केला. आता संतांनी प्रतिपादिलेली वर्णसमता, भिन्न देवतांचे आणि भिन्न धर्मपंथांचे ऐक्य अशा काही लक्षणांचा विचार करावयाचा आहे.

(१) वर्णसमता
विषमता
 संतांच्या काळी हिंदू समाजात वर्णविषमता आणि जातिविषमता पराकोटीला पोचली होती. हिंदू धर्मात अगदी प्रारंभीचा काळ सोडला तर दीर्घ काळापासून वर्णविषमता आहे. प्रारंभीच्या काळात शूद्रांनाही यज्ञाचा अधिकार होता. उपनिषदांत ब्राह्मणांप्रमाणेच क्षत्रिय राजे आणि शुद्रही ब्रह्मतत्त्वाचे केवळ अध्ययन नव्हे, तर अध्यापनही करताना दिसतात. पण नंतरच्या काळात हळूहळू वर्णभेद तीव्र होऊ लागले आणि मग वर्णसंकरातून जातिभेद आणि अस्पृश्यताही निर्माण झाली. तरीही आठव्या नवव्या शतकापर्यंत शूद्राचे अन्न ब्राह्मणाला चालत असे. क्षत्रिय ब्राह्मण स्त्री स्वीकारीत असे आणि ब्राह्मणाला क्षत्रिय, वैश्य व शूद्र या वर्णाच्या स्त्रिया चालत असत. पण हळूहळू ही उदार दृष्टी लोप पावली आणि वर्णभेद व जातिभेद फार कडक होऊ लागले. २१