पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१९
संतांचे कार्य
 

दृष्टीने या त्यांच्या प्रयत्नांचे फार महत्त्व आहे. या सर्व लक्षणांचे वर्णन पुढील लेखात करू. तत्पूर्वी येथे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम या धुरेच्या संतांनी केलेला उपदेश बहुजनसमाजात कसा त्वरित पसरला आणि मान्यता पावला हे ज्ञानेश्वरांच्या व नामदेवांच्या प्रभावळीतल्या काही संतांच्या वचनांच्या आधारे पाहू आणि हे प्रकरण पुरे करू.

सकलसंतगाथा
 मुक्ताबाईचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. एका अभंगात ती म्हणते, 'थोरपण जेथे वसे, तेथ भूतदया असे, रागे भरावे कवणाशी, आपण ब्रहा सर्व देशी ॥ ऐसे समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥' जगमित्र नागा हा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतलाच, पिरंगुट येथे राहणारा कवी. तो म्हणतो, 'हीच उपासना धरा, नरदेही सार्थक करा, भक्ती देवाची करावी, भेददृष्टी ते सोडावी ॥ आत्मा आहे भूतांत, भूते आहेती आत्म्यात ॥' नरहरी सोनार याने हाच सिद्धांत सांगितला आहे. 'जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वाभूती एक पांडुरंग ॥ अणुरेणूपर्यंत ब्रह्म भरियेले, सर्वावरी राहिले अखंडित ॥' भूतमात्राच्या ठायी पांडुरंग आहे, आणि त्याची भक्ती हीच खरी उपासना, असाच सर्वाचा भावार्थ आहे.
 यापुढे अनेक संतांची संसार, कर्मकांड, नीतिधर्म यांविषवियीची वचने, काही टीकाभाष्य न करता देतो; ज्ञानेश्वर, नामदेव यांचीच तत्त्वे ते सांगत आहेत हे त्यांवरून सहज ध्यानात येईल. 'जयाचियासाठी जातो वनाप्रती । ते (काम क्रोध) तो सांगाती येती तेथे ॥ जयाचियासाठी टाकिला संसार । ते (मायामोह) तो बलवत्तर पाठी येती ॥' (चोखामेळा). 'सुखे संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥ जैसा सूर्य घटाकाशी । तैसी देही जनी दासी ॥' (जनाबाई).
 दया, क्षमा, शांती हाच खरा धर्म हा महासिद्धांत प्रत्येकाने सांगितला आहे. 'अंगी हो पै शांती । दया, क्षमा सर्वा भूती ॥ जैसी दया पुत्रावरी । तेचि पाहे चराचरी ॥' (जनाबाई). 'सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरि कीर्तन ॥ दया, क्षमा, समाधान । ध्यावे संतांचे दर्शन ॥' (नरहरी सोनार). 'करिता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ॥ करिता परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥ आवडे जगा जे काही | तैसे पाही करावे ॥' (सेना न्हावी) . 'धिक् ब्रह्मज्ञान वाउग्या या गोष्टी । दया, क्षमा, पोटी शांती नाही ॥' (चोखा मेळा).
 'न लगती तीर्थे, हरिरूपे मुक्त | अवघेचि सूक्त जपिनले ॥ मुक्ताई हरिनामे सर्वदा पै मुक्त । नाही आदि अंत उरला आम्हा ॥' (मुक्ताबाई). 'न लगे धूम्रपान, पंचाग्नि- साधन । करिता चिंतन हरी भेटे ॥ बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गाये गीत विठोबाचे ॥ करि योगयाग, सिद्धी न पवेचि सांग | देव भावावीण नाही, एर व्यर्थ शीण ॥' (सेना न्हावी) .