पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३१८
 

इच्छे आणिका पीडी । काय ते देईल वराडी ॥'

ध्येयवाद
 आज आपण ध्येयवादाच्या भाषेत बोलतो. माणसाचे ध्येय उच्च असावे. मग ते साधण्यात अपयश आले तरी चिंता नाही. काही असाध्य साध्य करताना अपयश आले तरी ते भूषणच होय. पण ध्येय क्षुद्र ठेवणे हे मात्र अगदी गर्ह्य होय. असले ध्येय साध्य झाले तरी त्याला किंमत नाही. ते दूषणच होय. कारण क्षुद्र ध्येयामुळे मनुष्य क्षुद्र होतो. तेच देवतांविषयी आहे. माणसाने पूजेसाठी थोर देवता निवडाव्या. उदार, कृपाळू, जगाचे पालनपोषण करणाऱ्या, विश्वाचे संरक्षण करणाऱ्या, केवळ भावभक्तीच्या भुकेल्या, अशा देवतांच्या पूजेने, भक्तीने, माणसाचे मन उंच होते, विशाल होते. विठ्ठल हा तसा देव आहे. संतांनी त्याचे परोपरीने तसे वर्णन करून लोकांना त्याची भक्ती शिकविली आणि जाखाई जोखाईसारख्या हीन अभंगळ देवतांपासून त्यांना मुक्त केले.

पाच लक्षणे
 संतप्रणीत भागवधर्माची लक्षणे आपण पाहात आहो. भक्तियोग हे त्याचे पहिले लक्षण होय. सर्वभूतांची सेवा हीच खरी भक्ती, हा त्या भक्तियोगाचा अर्थ आहे. स्वधर्माचरण हे त्याचे दुसरे लक्षण होय. वर्णप्राप्त कर्तव्ये करून त्या कर्मांनी परमेश्वराची पूजा करावयाची याचे नाव स्वकर्माचरण. त्यामुळेच लोकसंस्थेचे रक्षण होते. संन्यासविरोध हे त्याचे तिसरे लक्षण होय. परमेश्वरप्राप्तीसाठी संसार सोडून वनात जाण्याची गरज नाही, असे संतांनी निक्षून सांगितले आहे. शुद्ध चारित्र्याची महती आणि कर्मकांडाचा निषेध हे भागवतधर्माचे चौथे लक्षण होय. शुद्ध चर्या, नीतिनिष्ठा यांवाचून समाजाचा कधीही उत्कर्ष होत नाही, हे जाणूनच संतांनी या गुणांचा महिमा गायिला आहे. हीन, क्षुद्र देवतांचा निषेध करून विठ्ठल या परमश्रेष्ठ दैवताच्या भक्तीचा उपदेश हे भागवत धर्माचे पाचचे लक्षण होय. क्षुद्र देवतांच्या उपासनेमुळे माणूस स्वतःच क्षुद्र होतो. ही आपत्ती टाळण्यासाठी संतांना हा उद्योग करावा लागला.
 संतांनी उपदेशिलेल्या भागवतधर्माची पाच लक्षणे येथवर विवरून सांगितली. आणखीही या धर्माची चारपाच लक्षणे अशीच विवरून सांगावयाची आहेत. भक्तीच्या दृष्टीने संतांनी सर्व वर्णाची समता उपदेशिली आहे. भेदाभेद ते अमंगळ मानतात. शिव, विष्णू, राम या देवतांमध्ये संत भेद करीत नाहीत. ही सर्व एकाच परमेश्वराची रूपे आहेत, असा त्यांचा सिद्धांत आहे. देवतांप्रमाचेच नाथ, दत्त, वारकरी या संप्रदायांतही भेद नाही, असा संतांचा उपदेश आहे. संतांनी हा सर्व उपदेश केला तो वेद, उपनिषदे या परंपरेचा धागा अतूट ठेवून, त्या परंपरेचा अभिमान बाळगून केला, आणि हा सर्व उपदेश अमृतातेही पैजा जिंकील अशा मराठीत केला. समाजसंघटनेच्या