पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१७
संतांचे कार्य
 

गोकर्ण क्षेत्र, अनंतव्रत, भोजनविधी, शैौचविधी, खाद्य पदार्थाचे विधिनिषेध यांनी युक्त असा धर्म गुरुचरित्राने सांगितला, असे त्या ग्रंथाचे अभिमानी आजही सांगत आहेत. कर्मकांडात्मक धर्माचा प्रभाव किती असतो ते यावरून कळून येईल.
 वैदिक कर्मकांडाचा उपनिषदांनी निषेध केला आहे. गीतेने वेदांचा उल्लेख करून वेदवादरत लोक कामात्मे व स्वर्गपर असतात, असा अभिप्राय व्यक्त करून स्थितप्रज्ञता, लोकसंग्रह, निष्काम कर्मयोग या धर्माचा उपदेश केला आहे. भक्तीचा उपदेश करताना त्या मार्गाने स्त्रिया, वैश्य, शूद्र हेही तरून जातील असे सांगितले आहे. म्हणजे या बाबतीत गीताही वर्णभेद मानीत नाही. याच भक्तिमार्गाचे संतांनी पुनरुज्जीवन केले आणि त्यालाच गुरुचरित्राचे अभिमानी हिंदुधर्मावरचे आक्रमण म्हणत आहेत.

(५) हीनदेवता पूजन
 कर्मकांडाइतक्याच तीव्रतेने संत हीनदेवतापूजनाचा निषेध करतात. त्या काळी बहुजनसमाजात जाखाई, जोखाई, मरी आई, सटवाई, काळकाई इ. हीन, क्रूर, अमंगळ अशा देवतांचे पूजन चालू होते. त्याचा निषेध करून देव ही एक क्रूर, सौदा करणारी, केवळ शासन करणारी, सूडबुद्धी बाळगणारी शक्ती नसून ती माऊली आहे, मातेप्रमाणे ती भक्तांचा प्रतिपाळ करते, यासाठी तिला काही बळी द्यावा लागत नसून केवळ भक्तीने, प्रेमाने ती वश होते, हा अतिशय उदात्त विचार संतांनी येथल्या समाजात दृढमूल करून टाकला. ज्या समाजाची दैवते उंच झाली तो संस्कृतीच्या वरच्या पातळीवर चढला, यात शंकाच नाही. महाराष्ट्र समाजाला अशा रीतीने वरच्या पातळीवर नेण्याचे कार्य संतांनी केले आहे.

अमंगळ देवता
 नामदेव म्हणतात, 'जाखाई जोखाई उदंड दैवते । वाउगेची व्यर्थ श्रमतोसि । अंतकाळी तुज सोडविना कोणी । एका चक्रपाणी वाचोनिया ॥' या देवता क्षुद्र आहेत, त्यांना बळी लागतो. 'तेणे न पावती सुख कल्लोळी एका विठ्ठला वाचोनिया ॥'
 एकनाथांनी आपल्या स्फुट अभंगांतून हाच भाव व्यक्त केला आहे. 'प्रेमी पूजी मेसाबाई, सांडोनिया विठवाई | काय देईल ती वोंगळ, सदा खाय अमंगळ ॥' ती मेसाबाई 'आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी ।' उलट 'तैसी नोहे विठाबाई, सर्व दीनांची ती आई.' हे क्षुद्र देव फजितीचे आहेत. आपणासाठी जगाला पीडणारे ते काळतोंडे आहेत. नरदेहाला येऊन अशा भूतांना जे भजतात ते महामूर्ख होत. 'एका जनार्दनी ऐसिया देव जो पूजी तो गाढवासम होय.'
 तुकारामांनीही या देवतांची अशीच संभावना केली आहे. 'सेंदरी हे देवी दैवते । कोण ती पूजी भुतेखेते ॥ आपुल्या पोटा जी रडती, मागती शिते अवदाने ॥ आपुले