पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३१६
 

२ वेळा - याचेही कडक नियम आहेत. यात काही चुकले तर माणसाच्या अंगावर जितके केस आहेत तितके दिवस नरकवास !

दोन आक्रमणे
 गुरुचरित्रात असा हा कर्मकांडात्मक धर्म सांगितलेला असून त्याचा त्या वेळी तर प्रभाव होताच पण आजही तो तसाच आहे. किंवा तो जास्तच वाढला आहे. हा प्रभाव ब्राह्मणवर्णात विशेष आहे. या ग्रंथाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघत आहेत. एक संक्षिप्त आवृत्तीही निघाली आहे. तीत गुरुचरित्राच्या कार्याविषयी जे विचार मांडले आहेत ते सांगतो. त्यावरून या ग्रंथाचा प्रभाव किती आहे ते कळून येईल.
 हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांनी कशासाठी लिहिला ? रिसबूड म्हणतात, त्या काळी हिंदुसमाजावर, हिंदुधर्मावर दोन आक्रमणे आली होती. एक मुसलमानांचे बाह्य आक्रमण व दुसरे भागवत संप्रदायाचे आक्रमण ! भागवत धर्म हे हिंदुसमाजावर आक्रमण होते म्हणजे काय ? रिसबूड म्हणतात, भागवत धर्म ऊर्फ भक्तिसंप्रदाय हा सुटसुटीत, आचारसुलभ, तंत्रमंत्र नसलेला, वैदिक कर्मकांड नसलेला आणि एकवर्णात्मक असा धर्म होता. त्यामुळे जनता त्याच्याकडे आकृष्ट झाली व मुस्लिम धर्मप्रचारास आळा बसला. पण त्या वेळी क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण नष्ट झाले होते. फक्त ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक होते. आणि या एकवर्णीय भक्तिसंप्रदायामुळे ब्राह्मण वर्णही नष्ट होण्याची वेळ आली होती. तो धोका टाळून, ब्राह्मण वर्णाची उन्नती करण्यासाठी दत्त संप्रदाय स्थापन झाला. आणि मुस्लिमांचे व भागवत धर्माचे अशा दोन्ही आक्रमणांस तोंड देऊन त्याने हिंदुसमाजाचे रक्षण केले.
 यांपैकी मुस्लिम आक्रमणास दत्त संप्रदायाने तोंड कसे दिले याचा विचार पुढे करू. भागवतधर्माच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी गुरुचरित्राने कोणते उपाय सांगितले ते येथे पाहू.
 भागवतधर्माचे रिसबूड यांनी जे वर्णन केले आहे त्यावरून ते उपाय कोणते ते सहज ध्यानात येईल. भागवतधर्मात तंत्रमंत्र नाही, कर्मकांड नाही, आणि तो एकवर्णात्मक आहे; म्हणजे तो भक्तीच्या दृष्टीने वर्णावर्णात उच्चनीचता मानीत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ असे म्हणतो. तेव्हा तंत्रमंत्र असलेला, वैदिक कर्मकांड असलेला व वर्णावर्णांत भेदभाव मानणारा असा धर्म सांगणे हा समाजरक्षणाचा उपाय होय हे स्पष्ट आहे. गुरुचरित्राने तो सांगून भागवत धर्माच्या आक्रमणास तोंड दिले असे रिसबूड यांचे म्हणणे आहे.
 ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांनी तंत्रमंत्र, कर्मकांड यांचा निषेध केला. भक्तिसंप्रदायात उच्चनीच असा भेद नाही, वर्णभेद मानणे अमंगळ आहे, असे सांगितले; त्यामुळे त्यांचा भागवतधर्म हे हिंदुसमाजावर आक्रमण ठरले. मुस्लिमांच्या आक्रमणासारखेच ते आक्रमण घातक ठरले आणि त्यावर उपाय म्हणून