पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१५
संतांचे कार्य
 

होती. तिला कोणीही भीक घातली नाही. त्यामुळे तिला उपवास घडला. त्याच वेळी कोणीतरी तिच्या हातात एक बेलाचे पान दिले. तिने ते संतापाने फेकून दिले. ते नेमके शिवलिंगावर जाऊन पडले. यामुळे तिला अपार पुण्य लाभले. आणि देवदूतांनी येऊन तिला विमानात बसवून स्वर्गाला नेले. अन्न नाही म्हणून घडलेला उपास आणि फेकून दिलेले – वाहिलेले नव्हे- बेलाचे पान याचे एवढे पुण्य ! या कृत्यांचा मनाशी, अंतःकरणाशी कसलाही संबंध नाही आणि संत तर सांगतात की देव भावाचा भुकेला ! संतांच्या भागवतधर्मात आणि या कर्मकांडात केवढा जमीन-अस्मानाचा फरक आहे, ते यावरून दिसून येईल.

अनंतव्रत
 बेचाळिसाव्या अध्यायात अनंतव्रत सांगितले आहे. सरस्वती गंगाधरांनी ते गुरूकडूनच वदविले आहे. सुशीला नावाची स्त्री होती. कौंडिण्य नावाचा तिचा पती. दोघेही प्रवासात असताना सुशीलेने एका नदीच्या काठी, काही बायकांच्या सांगण्यावरून, तेथेच फुले, वाती, कापूर घेऊन अनंताची पूजा केली. घरी पोचताच त्या दोघांना ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे कौंडिण्याच्या आज्ञेवरून तिने ते व्रत बंद केले. तेव्हा सर्वनाश ओढवला. पुन्हा सुरू केले तेव्हा पुन्हा राज्यप्राप्ती झाली ! या व्रताचा महिमा असा की भगवान श्रीकृष्णांनी, वनवासात पांडवांना ते भेटावयास गेले असताना, तेथे त्यांना गेलेले राज्य परत मिळविण्याचा उपाय म्हणून, ते सांगितले आहे. आणि ते घारगे, खीर, इ. पक्कान्नांच्या तपशिलासह. पण पुढे त्याच श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता कशाला सांगितली, आणि त्याच्याकडून युद्ध करविले, हे ध्यानात येत नाही. पुनः पुन्हा त्याच्याकडून अनंतव्रत करवून घेतले असते तर काम भागले असते !

बाह्य आचार
 तीर्थक्षेत्रे आणि व्रते यांचे हे माहात्म्य झाले. इतर बाह्य आचारांचा महिमा शास्त्री- पंडितांप्रमाणेच सरस्वती गंगाधरांनी सांगितला आहे. जेवताना कोणत्या लोकांनी कोणत्या धातूच्या भांड्यातून जेवावे, तांब्याचे, पितळेचे, काशाचे, ही भांडी कोणाला वर्ज्य, कोणाला युक्त हे तपशिलाने सांगितले आहे. जेवताना पाचही बोटांनी घास घ्यावा. एक बोट सोडून कोणी जेवला तर गोमांसभक्षण केल्याचे पातक लागते. तोंड धुवायचे ते मधल्या बोटाने धुतले तर मनुष्य रौरव नरकात जातो. लसूण, गाजर, कांदा, मुळा, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा यांतले कोणत्या तिथीला काय चालेल व काय वर्ज्य याविषयीही नियम सांगितलेले आहेत. त्यांपैकी एखाद्याचा जरी भंग झाला तरी रौरव नरक ! शौचाहून आल्यावर माती किती वेळा लावावी, ब्रह्मचाऱ्याने किती वेळा, गृहस्थाने किती वेळा, भिन्न वर्णाच्या माणसांनी किती वेळा, नंतर चुळा किती वेळा भराव्या - ब्राह्मणाने ८ वेळा, क्षत्रियाने ६ वेळा, वैश्याने ४ वेळा व शूद्राने