पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३१४
 

पीडन सांडोनिया, भजन हरीचे करा ॥' या अभंगात नामदेवांनीही नीतिधर्माची अशीच महती गायिली आहे. आणि 'सर्वाभूतीं कृपा, संतांची संगती । मग नाही पुनरावृत्ती जन्ममरण ॥' अशी भक्तांना ग्वाही दिली आहे.

शुद्ध चर्या
 संत परमेश्वराचे पूजन कसे करतात ? तुकाराम म्हणतात, 'शुद्धचर्या हेचि संतांचे पूजन | लागतचि नाही धन वित्त ॥' (जोगगाथा, ४३८). ते आपल्या शुद्ध आचरणाने विठ्ठलाची पूजा करतात. त्यासाठी त्यांना धन लागत नाही. परमार्थसाधनाची, जन्ममरण टाळण्याची नामदेवांनी सांगितली तीच दोन साधने तुकारामांनी सांगितली आहेत. 'परद्रव्य, परनारी यांचा धरीरे विटाळ । साधने तरी हीच दोन, जरी कोणी साधील...' आणि 'यामुळे देव, भाग्ये घरी येती, संपत्ती त्या सकळा ॥' अनीतीचे सर्वत्र रूढ असलेले जे दोन प्रकार त्यांचा मुद्दाम निर्देश करून तुकारामांनी त्यांचा निषेध केला आहे. लाच घेऊन खोटा न्याय देणे आणि पैशावर नजर ठेवून वैद्याने भलतीच ओषधे देणे, हे ते दोन प्रकार होत. 'लोभावरी ठेवूनि हेत । करी असत्य न्यायनीत ॥', 'न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥' तुकारामांना नीतिदृष्ट्या सर्वात वंद्य कोण वाटतो ? 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !' ही शुद्ध चर्या किती दुर्मिळ आहे हे पावलोपावली प्रत्येकाला दिसतच असते.

गुरुचरित्र
 तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, टिळेटोपीमाळा, गंधभस्म, हे जे सर्व कर्मकांड त्याचा पुरातन काळापासून थोर धर्मवेत्ते निषेध करीत आले आहेत. पण तरीही त्याचा जोर कमी होत नाही. याचे कारण उघड आहे. एकतर मनोनिग्रह, वासनाजय यांपेक्षा त्याचे आचरण सुलभ असते, आणि दुसरे म्हणजे त्यामुळे धनलाभ, पुत्रलाभ, राज्यलाभ असे अनेक लाभ होतील, अशी आश्वासने त्याचे प्रणेते देत असतात. शास्त्री- पंडितांच्या निर्णय सिंधूसारख्या ग्रंथांचे जे विवेचन मागे केले त्यावरून हे स्पष्ट होईल. तशाच तऱ्हेचा मराठीतला ग्रंथ जो गुरुचरित्र त्याचा विषयपूर्तीसाठी येथे विचार करू. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी इ. स. १५५८ साली लिहिला. त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती या दोन दत्तावतारी पुरुषांचे चरित्र दिलेले असून त्या गुरूंच्या मुखातूनच वरील प्रकारच्या धर्माचा उपदेश केलेला आहे.

गोकर्ण क्षेत्र
 सातव्या अध्यायात सांगितलेले गोकर्ण या क्षेत्राचे माहात्म्य पाहा. एक चांडाळ स्त्री वृद्ध, अंध, महारोगी अशी होती. ती अत्यंत पापी होती. आधीच्या जन्मीही तिने फार पापे केली होती. ती स्त्री कशी तरी या क्षेत्री येऊन एका झाडाखाली पडली