पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१३
संतांचे कार्य
 

भाविकासी दिसे बैसल्या ठायी,' अशा शब्दांत एकनाथांनीही व्रतवैकल्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. व्रतवैकल्याप्रमाणेच टिळाटोपीमाळा यांचाही ते निषेध करतात- 'टिळा टोपी घालुनी माळा, म्हणती आम्हां संत ।', 'पाय घालुनी आडवा, काय जपतोसि गाढवा ।' शरीरदंडन हाच धर्म, असे मानणारांची एकनाथांनी अशी शोभा केली आहे. भावभक्तिहीन अशा या ज्या शारीरिक कवायती त्यांचा त्यांना आणि सर्वच संतांना अतिशय तिटकारा असे. 'भाव धरावा बळकट । आणिक काही नको कष्ट ॥' असे त्यांचे मत होते. मनापासून खरी परमेश्वराची भक्ती करणाऱ्या भक्तांबद्दल, इंद्रियनिग्रह करून, अहंकाराचा त्याग करणाऱ्या हरीच्या दासांबद्दल, त्यांना एवढा आदर असे की त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही, कारण, 'तीर्थ करिती त्यांची यात्रा' असे एकनाथांनी म्हटले आहे.

भीतरी चांगा
 दांभिक बाह्य आचार, सोंगेढांगे यांची तुकारामांना इतर संतांपेक्षा दसपट चीड असे. संन्यासी, कानफाटे, मलंग, जंगम या सर्वांना ते मायेचे मइंद म्हणतात. हे सर्व पोटभरू लोक - 'त्याजपाशी गोविंद नाही नाही ।' तीर्थ यात्रा, व्रते यांविषयी त्यांचे हेच मत आहे.
 'काय काशी करिती गंगा । भीतरी चांगा नाही जो ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाही ज्या ॥'
 कर्मकांड, जड आचार धर्म या हीन धर्माचा निषेध करून नीती, शुद्ध चारित्र्य, निर्मळ जीवन या खऱ्या धर्माचे, शुद्ध भागवतधर्माचे महत्त्व संतांनी समाजमनावर बिंबविले, हे त्यांचे फार मोठे उपकार आहेत. 'भीतरी चांगा असणे' हाच त्यांच्या मते खरा धर्म होय. चित्तशुद्धी हेच खरे चारित्र्य होय.

नीतीचे आदर्श
 भक्त हे नीतीचे, चारित्र्याचे केवळ आदर्श असतात. जयांचिये लीळेमाजी नीती जियाली असे ॥ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. त्यांचे सहज वागणे हाच नीतीचा खरा आधार होय. परमेश्वराचे हे भक्त कधी कोणाचा द्वेष करीत नाहीत, सर्व प्राणिमात्राशी त्यांची मैत्री असते, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनात कसलाही भेदभाव नसतो. ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात, भक्तांची लक्षणे सांगताना, पृथ्वी, दीप, पाणी यांची उदाहरणे देऊन, त्यांच्या ठायी समभाव किती उत्कट असतो हे विशद केले आहे. 'आणि मी हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे!' या वाक्यात सर्व नीतीचे त्यांनी सार सांगितले आहे. कारण या मीपणातूनच सत्तालोभ निर्माण होत असतो. या दोन लोभांतूनच सर्व अनीती, सर्व भ्रष्टाचार उगम पावतात.
 'पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥ परनिंदा, पर-