पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३१२
 

येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हे अर्जुना वाया बोलिजे । मूर्खपणे ॥' मग नैष्कर्म्य म्हणजे काय ?– 'ब्रह्म तेचि कर्म । ऐसे बोधा आले जया सम । तथा कर्तव्य ते नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥' (४.१२१) सर्व कर्मे ही ब्रह्मोपासना आहे असे स्थितप्रज्ञ, सम बुद्धीने जो मानतो, त्याचे कर्तव्य, त्याचे सर्व उद्योग म्हणजे नैष्कर्म्य होय. म्हणून 'गृहादिक आघवे । ते काही न लगे त्यजावे । जे येते जाहले स्वभावे । निःसंगु म्हणउनी ।' (५.२२)

(४) कर्मकांडनिषेध
 निष्कामकर्म, त्यागबुद्धी, स्थितप्रज्ञता, मनोनिग्रह, वासनाजय हा खरा धर्म होय असा संतांचा निश्चय होता. लोकसंग्रह, विश्वाची सेवा, रंजल्यागांजलेल्यांना हृदयाशी धरणे, दया, क्षमा, शांती, भूतांचे पालन, कंटकांचे निर्दालन हा शुद्ध भागवत धर्म होय, असा त्यांचा ठाम सिद्धान्त होता. त्यामुळे कर्मकांडाचा जागोजागी निषेध करून त्यांनी नीतीला- सत्य, चारित्र्य, निःस्पृहता या नीतितत्त्वांना - धर्मविचारात अग्रस्थान दिले आहे.

व्रततप न लगे
 शास्त्री पंडितांनी कर्मकांडालाच सर्व महत्त्व देऊन धर्माला किती हीन पातळीवर आणून ठेवले होते, हे मागे आपण पाहिलेच आहे. तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, तिथीवार, श्राद्धपक्ष, मंत्रतंत्र हाच त्यांच्या मते धर्म होता. संतांनी या कर्मकांडात्मक धर्मावर कडक टीका केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे, तीर्थासि गा ॥', 'योगादिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रतंत्र विधाने । झणी करा ॥' (करू नका); तर तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाने भगवंतांची आराधाना करावी (३-८९-९१) नागपंचमीला नागाची पूजा, चतुर्थीला गणेशाची, एकादशीला विष्णूची आराधाना, या सर्वांपुढे नवससायास करणे, हे करून शिवाय तीर्थयात्रेला जाणे या सर्व अवडंबराची, जड, भावहीन, काम्यकर्माची ज्ञानेश्वरांनी अत्यंत कटू शब्दांत निर्भर्त्सना केली आहे. नामदेवांनी अशाच शब्दांत व्रत- वैकल्यावर टीका केली आहे. 'व्रततप नलगे करणे, नलगे तुम्हां तीर्था जागे ॥ आपुलेचि ठायी असा सावधान, करा हरिकीर्तन सर्व काळ ॥' यात्रा, व्रते यांचा, भस्म, दंड, जटा, त्रिपुंड्र, तुळशीमाळा, चंदनाची उटी यांचाही, नामदेव निषेध करतात आणि 'सर्वाभूती समदृष्टी, हेचि भक्ती गोड मोठी' असा भक्तांना उपदेश करतात.

भाव धरावा
 'केले काय तुवा जाउनिया तीर्था । सर्वथा विषयासी भुललासी ॥ वरी दिसशी शुद्ध, अंतरी मलिन । तोवरी हे स्नान व्यर्थ होय ॥ मन शुद्ध झालिया, गृहीच देव वसे,