पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३११
संतांचे कार्य
 

सरळ मार्गाने वासनांची तृप्ती न झाल्यामुळे हा मनुष्य आडमार्गी जातो. उलट 'देही असोनि नाही अहंकृती । गेही असोनि नाही गृहासक्ती | शेखी लोकांमाजी लौकिकस्थिती । सुखे वर्तन लोकांसारिखे ॥' मनुष्याने अहंकाराचा, मीपणाचा त्याग केला, संसारातील भोगांविषयीची आसक्ती सोडली तर तो खरा त्यागी ठरतो, असा मनुष्य लोकांतच राहतो, लोकांसारखाच वागतो. तो मोठा ठरतो तो त्याच्या मनोजयामुळे, भूतदयेमुळे; अलौकिक, विपरीत आचरणामुळे नव्हे.

समाधी
 'प्रपंच सांडूनि वना गेला । तो देहप्रपंचे अडकला । देही देहो जेणे मिथ्या केला । तो सत्य जाण अकिंचन ॥ विवेकेवीण वैराग्य गहन । ते केवळ आंधळे जाण । सर्वाभूती भगवद्भावो । हे वैराग्य युक्ति पहा हो ॥' या एकनाथांच्या वचनांचा भावार्थ हाच आहे. याच संदर्भात समाधीविषयी त्यांनी केलेले विवरण फार प्रसिद्ध आहे. त्याचा सारांश असा. समाधी म्हणजे भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञता. संसारात राहून कर्माचरण करीत असताना ही स्थितप्रज्ञता प्राप्त होत नाही असे जे म्हणतात त्यांना अध्यात्म मुळीच कळलेले नाही. अर्जुनाला भगवंतांनी प्रथम स्थितप्रज्ञता शिकविली आणि लगेच युद्धात लोटले. याचा अर्थ हाच की स्वकर्माच्या आचरणाने स्थितप्रज्ञतेला बाध येत नाही. ताटस्थ्य म्हणजे स्वधर्माचरणापासून, सांसारिक उद्योगापासून दूर राहणे. ही खरी समाधी म्हणजे स्थितप्रज्ञता नव्हे. 'ताटस्थ्या नाम समाधी । म्हणेल त्याची ठकली बुद्धी । हे समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाण नुसती मूर्च्छा आली.' कर्मापासून अलिप्त राहणे ही निश्चितपणे समाधी नव्हे. ती मूर्च्छा आहे. संसारात राहून, स्वधर्माचरण करीत असतानाही, जी मनःशांती अंगी बाणते ती खरी समाधी. ती खरी स्थितप्रज्ञता. 'इंद्रियी वर्तता विषयी विरक्त, तो भगवद्भक्त धन्य होय.'

नैष्कर्म्य
 ज्ञानेश्वरांचे या बाबतीतले विवेचन अतिशय स्पष्ट आहे. संसारासाठी करावी लागणारी कर्मे, ते व्यावहारिक उद्योग, मोक्षाच्या आड येतात, म्हणून त्यांचा त्यागच केला पाहिजे, संसार करून मोक्षलाभ कधीही होणे शक्य नाही, असा संन्यासवादी लोकांचा सिद्धांत होता. त्याला उत्तर म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात - 'जयाचे ऐहिक धड नाही ! तयांचे परत्र पुससी काई ?' ( ४. १५४ ) या इहलोकीचा संसार, येथले जीवन ज्यांचे यशस्वी होत नाही ते मोक्षाच्या बाबतीत, परलोकसाधनात कसे यशस्वी होणार ? उलट निष्काम बुद्धीने, आसक्ती न ठेवता संसार केला तर इह आणि पर दोन्ही साधतात. 'ऐहिक तरी न नशे । आणि मोक्ष तो उरलाचि असे ॥' ज्ञानेश्वरांचे नैष्कर्म्य या शब्दावरचे विवरण या दृष्टीने अगदी निर्णायक आहे. कर्माचा, सांसारिक उद्योगांचा त्याग म्हणजे नैष्कर्म्य, असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. 'की प्राप्तकर्म सांडिजे ।