पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३०८
 

आघवे, हवनद्रव्य मानावे, मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदिपुरुषो' ही तिसऱ्या अध्यायातील वचने प्रसिद्धच आहेत. स्वधर्म आचरिताना सर्व संपत्तीवर पाणी सोडावे; एवढेच नव्हे, तर अवश्य तर प्राणही अर्पावा, असेही ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. 'या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचु होईल जीविता, तोही निका, वर उभयतां, दिसतसे' अशा प्राणार्पणाने उभयता म्हणजे दोन्ही लोकी कल्याण होईल. (ज्ञानेश्वरी ३ -१३०, २२९)

लोकसंस्थेचे रक्षण
 स्वधर्माचा असा आग्रहाने उपदेश करण्याचे कारण असे की 'पुढतपुढती हे पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा, म्हणऊनीया - ' (३- १७०) या सर्व लोकसंस्थेचे म्हणजे समाजाचे रक्षण झाले पाहिजे. ते रक्षण करणे हे चारही वर्णांचे कर्तव्य असल्यामुळे त्यांनी आपापली वर्णप्राप्त कर्मे, फलाशा टाकून, म्हणजे समाजहित बुद्धीने, केली पाहिजेत. अर्जुन हा क्षत्रिय. 'क्षत्रिया आणिक काही, संग्रामावाचूनि उचित नाही.' हा क्षात्रधर्म त्याने सोडला तर काय होईल ? 'पूर्वजांचे जोडले, आपणचि होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले, रणी इये ॥ पूर्वजांनी येथे जे वैभव निर्माण केले आहे ते आपण घालविले, असे होईल. आणि पतीवाचून स्त्रीची जी अवस्था होते ती, तू जर स्वधर्म सोडलास तर तुझी होईल. म्हणून, आता ऊठ, 'आणि या भारापासोनि सोडवी, मेदिनी हे!' या पृथ्वीचे म्हणजे सामाजाचे रक्षण कर.

शुद्ध भागवतधर्म
 एकनाथांनी स्वधर्माचे विवरण करताना हाच अर्थ सांगितला आहे. 'जे जे कर्म स्वाभाविक । ते ते ब्रह्मार्पण अहेतुक | या नाव भजन निर्दोख । भागवत धर्म याचि नाव शुद्ध ॥' स्वकर्म हीच फुले, त्यांनी देवाची पूजा करावी, असे ज्ञानेश्वर म्हणतात. ती कर्मे निर्हेतुकपणे करणे हेच भजन होय, असे एकनाथ म्हणतात. आणि त्यांच्या मते हाच खरा भागवत धर्म होय. 'चहू आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम | तेथे स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥' एकनाथांना वर्णव्यवस्थेप्रमाणेच आश्रमव्यवस्थाही मान्य होती. पण सर्व आश्रमांत गृहस्थाश्रम श्रेष्ठ होय असे त्यांचे मत होते. त्या निजाश्रमात राहून वर्णाश्रमव्यवस्थेचे तू संरक्षण कर, असे ते म्हणतात. 'उचिताचे धर्म । भागा आले ते करू,' 'आला भागासी तो करीं वेवसाव । परी राहो भाव तुझ्यापायीं ॥' या वचनांतून तुकारामांनीही प्राप्तकर्म, भागा आलेला वेवसाव, वर्णाप्रमाणे ठरलेला उद्योग, म्हणजेच स्वधर्म किंवा विहितकर्म यांचाच उपदेश केला आहे.
 स्वधर्माची महती संतांनी सांगितली याच्या मागेही तोच दृष्टिकोन आहे. भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे. भूतमात्राच्या ठायी परमेश्वर आहे म्हणून भूतमात्राची