पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३०९
संतांचे कार्य
 

सेवा ही खरी भक्ती होय. त्याचप्रमाणे निष्कामबुद्धीने, फलाशेचा त्याग करून, त्याग-बुद्धी मनात ठेवून, वर्णप्राप्त कर्मे करीत राहणे ही पण परमेश्वराची भक्तीच होय, असा संतांचा भावार्थ होता. ही सर्व लोकसंस्था, समाजसंस्था टिकून राहिली पाहिजे, समाजाचा उत्कर्ष झाला पाहिजे, याविषयी संतांना संदेह नव्हता; म्हणूनच त्यांनी स्वधर्माचरणाचा कटाक्षाने उपदेश केला आहे.

(३) गृहस्थाश्रम
 स्वधर्माचरणाचा आग्रह धरला की संन्यासाला विरोध ओघानेच येतो. महाराष्ट्रातील सर्व संतांनी यामुळेच संन्यासाला, संसारत्यागाला निक्षून विरोध केला आहे. महाराष्ट्रात आणि खरे म्हणजे अखिल भारतात त्या काळी संन्यासवादाचा फार प्रभाव पडला होता. या संन्यासवादाचे म्हणजेच निवृत्तिवादाचे मुख्य प्रवर्तक म्हणजे आद्य श्री शंकराचार्य हे होत. पुढच्या काळात रामानुजाचार्य, मध्वाचार्य असे मोठमोठे आचार्य होऊन गेले. शंकराचार्यांशी त्यांचे मूळ तात्त्विक सिद्धान्ताविषयी, पुष्कळच मतभेद होते, पण संन्यास, निवृत्ती यांविषयी सर्वाचे एकमत होते. महाराष्ट्रात महानुभावपंथाचा आधीच उदय व प्रसार झाला होता. हा पंथ तर पराकाष्ठेचा निवृत्तिवादी होता. भागवत पुराण हे शंकराचार्यानंतर एकदोन शतकांनी म्हणजे नवव्या दहाव्या शतकात लिहिले गेले. ते पुराणही अतिरेकी निवृत्तिवादाचाच पुरस्कार करते. भागवत धर्माचा उदय वेदकाळीच झालेला आहे. वेदप्रणीत भागवतधर्म पूर्ण प्रवृत्तिवादी होता. पण त्यानंतर काही उपनिषदांनी संन्यासवादाचा जोराने पुरस्कार केला. संन्यासवाद हा समाजाला नेहमीच घातक ठरतो. हे जाणून श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कर्मयोगाचे प्रतिपादन फार आग्रहाने केले. त्यानंतर बौद्ध व जैन या धर्माच्या प्रणेत्यांनी संपूर्ण निवृत्तीचा संदेश समाजाला दिला. पण महाभारत आणि स्मृती या ग्रंथांच्या कर्त्यांनी प्रवृत्तिवादाचा पक्ष अत्यंत प्रभावीपणे उचलून धरला. त्यामुळेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत भारतात सुवर्णयुग अवतरले होते. त्यानंतर शंकराचार्यांचा उदय झाला आणि भागवतपुराण हा ग्रंथ अवतीर्ण झाला. आचार्य हे ज्ञानमार्गाचे व भागवतकार हे भक्तिमार्गाचे प्रणेते आहेत. पण निवृत्तीविषयी, संसारनिषेधाविषयी त्यांचे मतैक्य आहे. आचार्यांचा भारतातील पंडितजनांवर आणि भागवताचा बहुजनांवर फार मोठा प्रभाव त्या काळी होता व अजूनही आहे. पुढील काळात झालेले रामानुजादी आचार्य हे निवृत्तिवादीच होते हे वर सांगितलेच आहे. संतांच्या उदयाच्या काळी अशी परिस्थिती होती. पण त्या ओघात वाहून न जाता संतांनी संसारत्यागाचा एकमुखाने निषेधच केला आहे.

वैदिक आणि पौराणिक
 भागवत धर्मामध्ये ही जी परिवर्तने झाली त्यांचे अतिशय उद्बोधक असे विवेचन