पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०७
संतांचे कार्य
 


प्राणिमात्राची सेवा
 सर्व भूतांच्या हृदयात ईश्वर आहे ही जाणीव ज्याला झाली त्याला, सर्व भूतांची दुःखे, विश्वाची दुःखे नाहीशी करणे, हाच धर्म होय याविषयी संदेह राहात नाही. 'ऐसे माझेनी नामघोषे । नाहीचि करती जगाची दुःखे । अवघे जगचि महासुखे । दुमदुमित भरले ॥' असे भक्तांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. अहिंसा या दैवी गुणाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी काय केला आहे ? जगाला सुख देणे ! 'आणि जगाच्या सुखोद्देशे | शरीर वाचा मानसे । राहटणे हे अहिंसे । रूप जाण ॥' (१६-११४)
 एकनाथांनी अहिंसेचा असाच अर्थ केला आहे. 'कायिक, वाचिक, मानसिक । भूता उपजे त्रिविध दुःख । ते जेथे निमाले निःशेख | अहिंसा देख ते ठायी ॥ कृपालुता याचा अर्थ हाच. '- आपणासी होय दुख । ते परासी न करी निःशेख । जे आपणिया होय सुख । ते आवश्यक करी प्राणिमात्रा ॥ - या नाव कृपालुता.'
 या अनेक वचनांवरून संतांच्या भक्तियोगाचा अर्थ स्पष्ट होईल. भूतांची, प्राणिमात्राची सेवा, मानवजातीवरचे प्रेम, विश्वाच्या सुखदुःखाची चिंता, रंजल्यागांजलेल्यांना हृदयी धरणे, हीच खरी भक्ती होय, असा तो अर्थ आहे.

(२) स्वधर्म
 स्वधर्माचे, विहितकर्माचे आचरण हे संतांच्या भागवतधर्माचे दुसरे लक्षण होय. सर्व संतांची चातुर्वर्ण्यावर श्रद्धा होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे परंपरागत चार वर्ण ते मानीत असत आणि या चारही वर्णांच्या लोकांनी, शास्त्राने सांगितलेली आपापली कर्मे केली पाहिजेत, असा संतांचा कटाक्ष होता. ही विहित कर्मे निष्ठेने करणे हीच परमेश्वराची पूजा, हीच खरी भक्ती, असे ते सांगत. नामस्मरणाचे संतांना अतिशय महत्त्व वाटत असे, यात शंका नाही. पण केवळ नामस्मरण, फळाफुलांनी केलेले पूजन, याला ते भक्ती म्हणत नाहीत. आपापली विहित कर्मे हीच खरी फुले आणि या फुलांनी केलेली परमेश्वराची पूजा ही खरी पूजा होय असा त्यांचा उपदेश आहे. 'तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा, तोषालागी.' स्वकर्मकुसुमांनी केलेली पूजा परमेश्वराला अपार संतोष देते, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. 'स्वकर्माचिया महापूजा, तोषला ईशु,' 'हे विहितकर्म पांडवा, हेचि परमसेवा, मज सर्वात्मकाची' याही वचनांचा तोच भावार्थ आहे. वर्णप्राप्त कर्माचे म्हणजेच स्वधर्माचे आचरण करणे हीच खरी परमेश्वराची पूजा होय. (१८ - १७)

यज्ञ
 स्वधर्माचरणाला ज्ञानेश्वरांनी यज्ञही म्हटले आहे. 'म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते तुज अखंड यजन॥', 'तुम्ही स्वधर्मयज्ञीं यजावे, अनायासे ॥', 'हे संपत्तिजात