पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
 

पहिला ग्रंथ इ. स. ११८८ या साली निर्माण झाला, आणि त्याच वेळी यादवांच्या साम्राज्याची स्थापना झाली. पुढील शंभर वर्षात महानुभाव पंथाचे अनेक ग्रंथ रचले गेले आणि १२९० च्या सुमारास ज्ञानेश्वरीचा अवतार झाला. म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकात स्वतंत्र निराळी मातृभाषा यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निश्चित झाली. तेव्हा इ. स. १२०० पासून या भूमीतील संस्कृती ती महाराष्ट्राची संस्कृती असे म्हणणे यथार्थ आहे. पण इ. स. पू. ३०० पासून या संस्कृतीचा इतिहास पाहावयाचा आहे असे वर म्हटले आहे. तेव्हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा हा जो १५०० वर्षांचा काळ, त्या काळातल्या या भूमीच्या संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृती असे म्हणणे कितपत युक्त होईल असा प्रश्न उद्भवतो.

पृथगात्मतेचा मागोवा
 प्राचीन काळी भारतात आर्यांची संस्कृती नांदत होती अशी वर्णने प्राचीन ग्रंथांत आहेत. प्रारंभीच्या काळात आर्य लोक विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आले नव्हते. त्यांच्या वसाहती सर्व उत्तर भारतातच झाल्या होत्या. पण त्या वेळी सर्व उत्तर भारताचा आर्यावर्त असा एक प्रदेश म्हणून उल्लेख होत असे. त्यातील भूभागांचा मगध, कोसल, कुरुपांचाल, कांबोज असा उल्लेख प्राचीन ग्रंथांत होत असे. पण त्यांपैकी कोणत्याच भूभागाला पृथगात्मता आलेली नव्हती. त्याची काही भिन्न संस्कृती आहे, प्रत्येकाची निराळी अस्मिता आहे अशी जाणीव कोणाला झाल्याचे प्राचीन ग्रंथांत दिसून येत नाही. सर्व आर्यावर्त हा येथून तेथून एक अशीच तत्कालीन लोकांची, धर्मवेत्त्यांची, ग्रंथकारांची, राज्यकर्त्यांची भावना होती. त्यानंतर इ. स. पू. १००० च्या सुमारास आर्यांचा दक्षिणेत प्रवेश झाला. पण तरीही भारताची विभागणी अशी झाली नाही. अखिल भारत हा एकच देश व त्याची सर्वव्यापक अशी एक संस्कृती अशीच सर्वांची धारणा होती. विंध्याच्या दक्षिणेच्या प्रदेशाला त्या वेळी दक्षिणापथ म्हणत. आणि मागल्या काळाप्रमाणेच या काळातही कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरान्त, कुंतल, देवराष्ट्र, असे दक्षिणापथातील भिन्न भूभागांचे निर्देश त्या काळच्या ग्रंथांत केले जात. पण तरीही त्यांना पृथगात्मता असल्याची कोणतीही लक्षणे त्या काळच्या ग्रंथांवरून दिसून येत नाहीत.
 मग ही पृथगात्मता केव्हापासून आली ? हा महाराष्ट्र, हा कर्नाटक, हा आंध्र, हा तामिळनाडू, हा गुजराथ, हा बंगाल असा निर्देश करणे आणि त्यांची संस्कृती पृथक आहे, स्वतंत्र आहे असे विधान करणे, हे केव्हापासून युक्त ठरेल ? आम्हा भारतीयांची संस्कृती भिन्न आहे, ती फार संपन्न आहे व फार प्राचीन आहे असा अभिमान आपण वाहतो त्यावेळी भारतातल्या प्रत्येक प्रदेशाचा नागरिक आपल्या आजच्या संस्कृतीचा धागा वेदकालापर्यंत मागे नेऊन भिडवतो. संस्कृत भाषा, वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण इ. ग्रंथ, हिंदुधर्म, विवाहउपनयनादी संस्कार, चातुर्वर्ण्यसंस्था, शिव-राम