पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

कृष्णादी दैवते ही या संस्कृतीची प्रधान लक्षणे आहेत. आणि त्यांची अतूट परंपरा प्रत्येक प्रदेशाला सहज दाखविता येते. ही परंपरा एका बाजूने चीन, रशिया, इजिप्त, अरबस्थान या देशांहून भिन्न आहे, सर्वस्वी भिन्न आहे आणि दुसऱ्या बाजूने भारतातल्या सर्व प्रदेशांना समान आहे, त्यांना व्यापणारी आहे. यामुळेच ही आमची 'भारतीय संस्कृती' आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो. तसा अर्थ 'महाराष्ट्र-संस्कृती' या शब्दाला प्राप्त होईल काय ? इ. स. १२००च्या सुमारास भिन्न भाषा, भिन्न राजसत्ता, भिन्न ग्रंथकार व भिन्न धर्मवेत्ते यामुळे महाराष्ट्राची अस्मिता निर्विवाद सिद्ध होते. पण त्यापूर्वीच्या १५०० वर्षांच्या काळात अशी भिन्नतेची काही लक्षणे दिसतात काय ? आजचे आम्ही जे भारतीय तेच वेदकाळी होतो असे म्हणताना आम्हाला जसा संस्कृतीचा अतूट धागा तेव्हापासून आतापर्यंत दाखविता येतो, चीन, रशिया, मिसर या देशांपासून आम्ही सर्वस्वी निराळे आहोत, आमची संस्कृती भिन्न आहे हे जसे म्हणता येते, तसे आजच्या महाराष्ट्रीयांना भारताच्या अपेक्षेने म्हणता येईल काय ? वंग, कलिंग, गुजराथ, आंध्र, कर्नाटक या प्रदेशांहून आम्ही त्या मागल्या १५०० वर्षांच्या काळातही भिन्न होतो, आमच्या आजच्या संस्कृतीचा धागा अतूटपणे त्या कालखंडाच्या प्रारंभापर्यंत नेऊन भिडविता येतो, आज आम्ही महाराष्ट्रीय आहो तसे त्या वेळीही आम्ही महाराष्ट्रीयच होतो, असे म्हणणे ऐतिहासिक प्रमाणांनी दाखविता आले तरच महाराष्ट्र संस्कृतीचा प्रारंभ इ. स. पू. तिसऱ्या शतकात झाला असे म्हणता येईल तेव्हा या प्रश्नाचा, या पृथगात्मतेच्या सिद्धतेचा प्रथम विचार केला पाहिजे.

ताम्रपाषाणयुग
 सध्या भारतात पुराणवस्तुसंशोधन चालू आहे. या खात्यातर्फे अखिल भारतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र उत्खनन चालू आहे. महाराष्ट्रात गोदावरी, प्रवरा, तापी, भीमा, कृष्णा, मुठा इ. नद्यांच्या काठी जी उत्खनने झाली त्यांच्यावरून या खात्यातील पंडितांनी महाराष्ट्राचा अतिप्राचीनकाळचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग असे या कालाचे हे पंडित तीन खंड करतात. अश्मयुगाचा काल सुमारे दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रातील अश्मपाषाणयुगाचा काल इ. स. पू. १५०० ते इ. स. पू. १००० असा असावा असे या पंडितांना वाटते. लोहयुगास त्यानंतर प्रारंभ होतो. कोल्हापूर, पैठण, कऱ्हाड, नेवासे, नाशिक इ. ठिकाणी या तीन युगांतील अवशेष सापडले आहेत. त्यावरून त्या काळच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे चित्र संशोधकांनी रेखाटले आहे. त्यावरून सष्ट असे दिसते की पहिल्या दोन युगांत महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती इतर मानवांपेक्षा कोणत्याच दृष्टीने निराळी नव्हती. कुऱ्हाड, फरशी, अशा तऱ्हेची अश्मयुगातली दगडाची हत्यारे वरील ठिकाणी सापडली आहेत. गिरमिटा