पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

आणि सिव्हिलिझेशन असे दोन संस्कृतिवाचक शब्द आहेत. सिव्हिलिझेशन याचा अर्थ भौतिक प्रगती असा अलीकडे केला जातो. उद्योगधंदे, गिरण्या कारखाने, शास्त्रीय शेती, वाहतुकीची साधने, सुखसोयी वाढविणारी अनेक प्रकारची यंत्रे, अनंतविध शस्त्रास्त्रे यांचा सिव्हिलिझेशनमध्ये अंतर्भाव होतो. मनोमय सृष्टी ती याहून निराळी. धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजनीती, साहित्य, कला, विज्ञान यांचा या सृष्टीत समावेश होतो. कल्चर याचा हा अर्थ आहे. पण वर दिलेल्या व्याख्या पाहिल्या म्हणजे कल्चर व सिव्हिलिझेशन या दोहींचाही अंतर्भाव मराठी 'संस्कृती ' या शब्दात केलेला आहे, असे दिसून येईल. त्यातल्या त्यात मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी ही व्याख्या सोपी व सुटसुटीत वाटते. तिने संस्कृती शब्दाची विवक्षा स्पष्ट होते. महाराष्ट्र संस्कृतीच्या या इतिहासात तीच अभिप्रेत आहे. या भूमीत निर्माण वा रूढ झालेले धर्मशास्त्र, येथील तत्त्वज्ञान, येथील राजपुरुषांनी अवलंबिलेली राजनीती, त्यांचे पराक्रम, त्यांची साम्राज्ये, येथे निर्माण झालेली भौतिकशास्त्रे, येथली साहित्यसृष्टी, कलासृष्टी येवढ्या व्यापक अर्थाने संस्कृती हा शब्द येथे योजिलेला आहे.

भाषातत्त्व
 आज महाराष्ट्र हा भारतीय संघराज्याचा एक घटक आहे. गुजराथ, पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, आसाम, म्हैसूर, आंध्र याप्रमाणेच महाराष्ट्र हाही एक भारताचा प्रधान घटक आहे. आपल्या संघराज्याचे घटक असे हे जे चौदा प्रधान प्रदेश ते प्रामुख्याने भाषातत्त्वावर भिन्न झालेले आहेत. गुजराथी, बंगाली, कन्नड, तामीळ इ. चौदा प्रमुख भाषा त्या त्या प्रदेशात बोलल्या जातात. आणि एक प्रदेश दुसऱ्या प्रदेशापासून निराळा झाला आहे तो भाषेमुळेच होय. धर्म किंवा वंश या वर्गीकरणाच्या तत्त्वांचा येथे काही संबंध नाही. हे भेद त्या तत्त्वांवर केलेले नाहीत. भारतात भिन्न धर्मांचे व वंशाचे लोक आहेत. नाही असे नाही. पण बहुतेक सर्व प्रदेशांत या सर्व धर्मांचे व वंशांचे लोक राहतात. आणि ते त्या त्या प्रांताची भाषा बोलतात. तेव्हा प्रदेश- विभागणी भाषातत्त्वावर झाली आहे, हे उघड आहे. अर्थात महाराष्ट्राची ही भिन्नता याच तत्त्वावर प्रस्थापित झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राची प्रस्थापना झाली त्या वेळी विदर्भ, मराठवाडा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला तो तेथील लोक मराठी भाषिक आहेत म्हणूनच आणि आज बेळगाव, कारवार व गोवा यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा, असा महाराष्ट्रीयांचा आग्रह आहे याचेही कारण हेच आहे. त्याला विरोध होत आहे त्याची कारणे राजकीय आहेत. सांस्कृतिक नाहीत. तेव्हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणूनच महाराष्ट्र हा आज निराळा झाला आहे हे निर्विवाद आहे.
 पण मराठी भाषिकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण निश्चित झाले ते साधारणतः इ. सन १२०० च्या सुमारास मराठी भाषेची उत्पत्ती विद्वानांच्या मते इ. स. ८००-१००० च्या सुमारास झाली. तिच्यातील 'विवेकसिंधू' हा