पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०१
शास्त्री पंडित
 

गंगेचा केवळ वारा लागला तरी मुक्ती मिळते, असे लोभी शास्त्र रूढ होऊन गुणविकास आत्मोन्नती हा धर्माचा मूळ हेतू लोप पावला. म. म. काणे म्हणतात, मध्ययुगीन निबंधकारांची प्रवृत्तीच अशी होऊ लागली की 'प्रत्येक गोष्टीचे, विधीचे, आचारांचे अवडंबर करून ती दुष्कर करून टाकावी. यातूनच पंडे, गयावळ यांच्या लोभी वृत्ती पोसल्या जाऊन यात्रेकरूंची लूट व नागवणूक सुरू झाली.' (खंड ४ था, पृ. ५८०) मध्ययुगीन शास्त्रीपंडितांनीच धर्माला अधर्माचे रूप कसे दिले ते यावरून कळून येईल.

नियमांचे जंजाळ
 आणि अवडंबर करण्याची ही प्रवृत्ती केवळ तीर्थयात्रांच्या बाबतीतच दिसते असे नाही. कालनिर्णय, तिथींचे शुभाशुभत्व, सुतकसोयर या प्रत्येक बाबतीत धर्मसूत्रे, स्मृती यांत एकपट असेल तर त्याचे दसपट करून मांडावयाचे हाच या मध्ययुगीन शास्त्री- पंडितांचा धंदा. घरात मूल जन्मले तर त्याचे सोयर एखादा दिवस पाळावे, असे स्मृतीतही सांगितले आहे. पण या शास्त्रीपंडितांनी ते दहापर्यंत वाढवीत नेले आणि त्यात मग आईला किती, बापाला किती, नात्यातल्या कोणत्या माणसाला किती यासंबंधीच्या नियमांचे जंजाळ ! सुतकासंबंधी हेच दिसते. लहान मूल मेले तर, नाळ कापण्यापूर्वी मेले तर इतके सुतक, दात येण्यापूर्वी गेले तर इतके ! मोठ्या माणसांच्या मृत्यूविषयीच्या सुतकाचे असेच अवंडबर श्राद्धपक्षांच्या नियमांचा असाच एक मोठा गुंतवळा आहे. ब्राह्मणांना बोलवावयाचे ते केव्हा बोलवावे, सकाळी निमंत्रणासाठी जावे की संध्याकाळी, आदल्या दिवशी की त्याच दिवशी, यांविषयी नियम. तरुण माणसाचे श्राद्ध असले तर कोणता ब्राह्मण, म्हाताऱ्याचे असले तर कोणता, याचे नियम. ब्राह्मणाच्या योग्यतेविषयी असेच दंडक आणि यात जरा चूक झाली की नरकवास !

समान धर्मशास्त्र ?
 अखिल हिंदू समाजाला, ब्राह्मणांपासून अत्यंजांपर्यंत सर्वांना समान असा एकही आचार, सर्वाना समान असे एकही धर्मसाधन हिंदुधर्मशास्त्राने सांगितलेले नाही, त्यामुळे भारतात धर्म हे संघटनतत्त्व कधीच होऊ शकले नाही, असा एक अक्षेप घेण्यात येतो. याला उत्तर म्हणून असे सांगण्यात येते की व्रते आणि तीर्थे हे आचार तसे आहेत. रामनवमी, शिवरात्र, एकादशी इ. व्रते व काशी, पुष्कर, रामेश्वर इ तीर्थक्षेत्रांच्या यात्रा या शूद्र चांडाळ यांना सुद्धा विहित आहेत. तेव्हा अखिल हिंदूंना एक धर्म, एक आचार नाही, असे म्हणता येणार नाही. पण हे उत्तर फोल आहे. कारण वते, तीर्थे ही, सर्व वर्णाना विहित व फलप्रद आहेत हे सांगताना, हिंदुसमाजातील वर्णविषमता जशीच्या तशी कायम ठेवण्याची, एवढेच नव्हे तर ती तीव्रतर करण्याचीही शास्त्री पंडितांनी तरतूद करून ठेवलेली आहे.