पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३००
 

त्याला जड कर्मकांडात्मक रूप येते व त्यामुळे समाजाचा अधःपात होतो. हा धर्म तिथीवर, बाह्य कर्मावर, खाण्यापिण्यावर, जड देहाच्या संस्कारावर म्हणजे टिळे, टोपी, भस्म यांवर भर देऊ लागतो. मध्ययुगीन धर्मशास्त्रज्ञांनी शास्त्रीपंडितांनी याचा अतिरेक करून खरा धर्म व त्याबरोबरच हिंदु-समाज रसातळाला नेला, हे मागे अनेक वेळा दाखविलेच आहे. तीर्थयात्रा हा जो एक साधनमार्ग त्याच्या विवेचनावरून हे अधिक स्पष्टपणे ध्यानात येईल.

तीर्थयात्रा
 धर्मसूत्रे व मनुयाज्ञवल्क्यांच्या स्मृती यांत तीर्थयात्रांचे फारसे माहात्म्य सांगितलेले नाही. धर्मसाधन म्हणून त्यांना महाभारत व पुराणे यांनी मात्र फार महत्त्व दिले आहे. पण तीर्थयात्रांचे महत्त्व सांगताना, या ग्रंथांनी त्यांमुळे होणाऱ्या नैतिक व आध्यात्मिक लाभावर सर्व भर दिला आहे. तीर्थयात्रांनी मनःशुद्धी होत नसेल तर त्यांचा काही उपयोग नाही, असा स्वच्छ अभिप्राय ते देतात. स्कंद, पद्म इ. पुराणांनी तर सत्य, क्षमावृत्ती, इंद्रियनिग्रह, परोपकार, ब्रह्मचर्य, ज्ञान, हीच खरी तीर्थ होत व मनःशुद्धी हे तीर्थांचे तीर्थ होय, असे सांगितले आहे. वायुपुराण म्हणते, जो पापी आहे, अश्रद्ध आहे, नास्तिक आहे, त्याला तीर्थापासून काही फल मिळणार नाही. खरा तीर्थस्थान कोण ? जो निग्रही आहे, शुद्ध आहे, निष्पाप आहे तो. केवळ देह गंगेत बुडविणे म्हणजे स्नान नव्हे. वामनपुराण म्हणते, जो लोभी आहे, दुष्ट आहे, क्रूर आहे, ढोंगी आहे, सदा भोगीसक्त आहे त्याने सर्व तीर्थांत स्नान केले तरी त्याचे पाप धुतले जात नाही. मासे पवित्र गंगाजलातच राहतात व तेथेच मरतात. पण तरी त्यांना स्वर्गप्राप्ती होत नाही. कारण त्यांची मनःशुद्धी झालेली नसते. ब्रह्मपुराण म्हणते, इंद्रियनिग्रही, वैराग्यशील मनुष्य जेथे असतो तेथेच कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर ही सर्व तीर्थे असतात (म. म. काणे, हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र, खंड ४ था, पृ. ५६३).

पंडे, गयावळ
 पण पुढच्या काळात या श्रेष्ठ मानसिक गुणांचे महत्त्व हळूहळू लुप्त होऊ लागले. आणि प्रत्येक बाबतीत भावहीन, भक्तिहीन जड क्रियांना महत्त्व येऊ लागले. पूजाविधी, स्नान, ब्राह्मणभोजने, नानाविध दाने, गंधभस्मलेपन, मुद्रा, क्षौर, वेणीदान या जड आचारांचे प्रस्थ माजले. गयावळ, पंडे, बडवे यांनी यांतून धंदा निर्माण केला आणि तो फारच फायदेशीर ठरू लागल्यामुळे, हिंदुस्थानात दरसाल हजारो, अक्षरश: हजारो, तीर्थक्षेत्रे निर्माण होऊ लागली. त्या क्षेत्रांची कल्पित माहात्म्ये रचली जाऊन तीं व्यासांच्या माथी मारली जाऊ लागली. दुर्दैव असे की ज्या पुराणांनी मनःशुद्धीचे अपार महत्त्व सांगितले त्यांतच पुढीलांनी भर घालून या बाह्य क्रियांचे स्तोम माजविले. आणि मग काशी किंवा कुरुक्षेत्र या क्षेत्रांत नुसते राहिल्याने मोक्ष मिळतो,