पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३०२
 


वर्णविषमता
 निर्णयसिंधू व शूद्रकमलाकर हे कमलाकर भट्टाचे ग्रंथ पाहा. अत्यंत प्राचीन काळी शूद्राला वेदमंत्रांचाही अधिकार होता, इतकेच नव्हे, शूद्रांनी वेदमंत्रांची रचनाही केलेली आहे, हे मागे सांगितलेच आहे. पुढील काळात शूद्रांचा वेदमंत्रांचा अधिकार नष्ट करण्यात आला. त्यांची धार्मिक कृत्ये पुराणमंत्रांनी करावी, असा दंडक घातला गेला. तरीही इ. स. १००० पूर्वी शूद्रांना पुराणोक्त मंत्रांचा पाठ स्वतः करण्याचा अधिकार होता. मिताक्षरेचा कर्ता विज्ञानेश्वर व कल्पतरूचा कर्ता लक्ष्मीधर हे अकराव्या व बाराव्या शतकातले निबंधकार. त्यांनीही शूद्राचा हा अधिकार मान्य केलेला आहे. पण कमलाकर भट्टाला तो मान्य नाही. शूद्रांना पुराणोक्त मंत्राचा पाठ करण्याचा त्याच्या मते अधिकार नाही. त्यांची धर्मकृत्ये व संस्कार पुराणमंत्रांनी करावे. पण ते मंत्र ब्राह्मणांनी म्हणावयाचे व शूद्रांनी फक्त ऐकावयाचे ! त्यांचा उच्चार त्यांनी करावयाचा नाही. शिवाची भक्ती, शिवरात्रीव्रत शूद्रांना विहित आहे. पण 'ॐ नमः शिवाय' या मंत्रातील ॐ चा उच्चार करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी उरलेला मंत्र म्हणावा. काही व्रतात उपवास करावयाचा असतो. तो कधी कधी तीन, चार, पाच दिवसांचाही असतो. पण शूद्रांना व वैश्यांनाही दोन दिवसांपेक्षा जास्त उपवास करण्याचा अधिकार नाही. प्रश्न असा येतो की हा भेद करून शास्त्रज्ञांनी काय साधले ? पण हा प्रश्न व्यर्थ आहे. कारण तशी कसलीही दृष्टी शास्त्रज्ञांना नव्हती समाजसंघटनेची दृष्टी या शास्त्रज्ञांना असती तर या विषमतेमुळे शुद्ध, चांडाळ हे हीनवर्णीय लोक मुस्लिम धर्माला बळी पडत आहेत, यासाठी आपण विषमता शक्य तो कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे धोरण त्यांनी आखले असते. पण हिंदूंचे धर्मांतर हे मोठे संकट आहे हे जाणण्याची ऐपतच कमलाकर भट्टासारख्यांना नव्हती, त्याला काय करणार ? उपवासाच्या दिवसापुरताच भेद करून तो थांबलेला नाही. कूर्मपुराणाच्या आधारे तो सांगतो की व्रत आचरणाऱ्या पुरुषाने त्या दिवशी महार, अंत्यंज, पतित यांना स्पर्श करू नये. त्यांच्याशी संभाषण करू नये, त्यांच्याकडे पाहूही नये. व्रतधर्म हिंदूतील सर्व वर्णांना समान म्हणून सांगितला आहे. त्यातील समानतेचा हा अर्थ आहे.
 बहामनी काळातील नेत्यांचा जो दुसरा वर्ग म्हणजे शास्त्रीपंडित त्यांच्या नेतृत्वाची चिकित्सा आपण करीत आहो. वरील विवेचनावरून आपल्या हे ध्यानात येईल की समाजाचे नेतृत्व करण्याची कसलीही ऐपत या शास्त्रीपंडितांच्या ठायी नव्हती. डॉ. काणे आणि जर्मन पंडित जॉली यांची या शास्त्रीपंडितांच्या विषयीची मते वर दिलीच आहेत. डॉ. काणे यांनी आपल्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथाचा समारोप करताना, शेवटच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या विभागात, पुन्हा याच स्वरूपाची टीका केली आहे. (पृ. १६२३). ते म्हणतात, गझनीच्या महंमदाने अनेक स्वाऱ्या केल्या. प्रत्येक स्वारीत त्याचाच विजय झाला. याची चिकित्सा, याची कारणमीमांसा एकाही