पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९९
शास्त्री पंडित
 

बुद्धिबल यांचे पोषण, थोडक्यात म्हणजे मनुष्याच्या व्यक्तित्वाचा विकास असा अर्थ सर्व थोर धर्मवेत्त्यांनी, संतांनी, तत्त्ववेत्त्यांनी व ऋषिमुनींनी सांगितलेला आहे. पण या शास्त्रीपंडितांना त्याचे तितकेसे महत्त्व वाटत नाही. त्यांच्या मते सर्व उत्कर्ष- अपकर्ष तुळशी- दुर्वा तोडण्याच्या तिथींवर, दात घासण्याच्या वारांवर, तेल, तीळ, चवळ्या, मसुरा, मध, दूध, हे पदार्थ खाण्या न खाण्यावर अवलंबून आहे. त्यांचा सर्व भर आहे तो जड, तांत्रिक क्रियांवर, कर्मकांडावर आहे. एकादशी, चतुर्थी या दिवशी उपवास करून मन एकाग्र करून भगवद्भजन करावे, नामजप करावा, एवढे सांगून ते थांबत नाहीत. अमक्या व्रताला अमक्या देवतेची उपासना करावी, पूजा करावी, इतक्यावर त्यांचे समाधान नाही. त्या उपवासाचे पारणे ठरीव वेळेच्या आत केले नाही, त्या व्रतांचे उद्यापन नेमक्या तिथीला किंवा वाराला केले नाही, तर कुलनाश होतो, घोर नरकात पडावे लागते, असे ते सांगतात. नवरात्रात देवीच्या स्तोत्रांचा पाठ करण्यास ते सांगतात. पण लगेच पुस्तक कशावर तरी ठेवून वाचावे, हातात घेऊन वाचले तर पाठ विफल होतो, असे बजावतात. पुस्तक कोणी लिहिलेले असावे यालाही महत्त्व आहे. स्वतः लिहिलेले चालणार नाही, शूद्राचे चालणार नाही. पुण्य मिळत नाही. श्राद्धामध्ये पितृपूजा यथासांग झाली तरी, ब्राह्मणभोजनाच्या वेळी अन्न लोहपात्रातून वाढले तर, दाता नरकात जातो. तूप, कोशिंबीर हे पदार्थ पळीनेच वाढले पाहिजेत, पाणी आणि पक्वान्न पळीने वाढू नयेत. हे पाळले नाही तर पदार्थ पितरांना प्राप्त होत नाहीत व खाणाराला पाप लागते ! (निर्णय सिंधू, पृ. ४८९) सर्व भूमी यवनांक्रात झाली असताना, मूर्ती, देवळे यांचा विध्वंस होत असताना, भयानक अत्याचारांमुळे स्त्रिया धाय मोकलून रडत असताना कमलाकर भट्टासारखे महाराष्ट्राचे धार्मिक नेते, ब्राहाणांना पळीने वाढावे की हाताने वाढावे, कोणती उद्यापने कशी करावी, चवळ्यांचे महत्त्व काय, मसुरांचे काय, यांचा गंभीरपणे विचार करीत होते. आणि त्यातून निघालेले निर्णय हिंदू जनतेला महान धर्म म्हणून उपदेशीत होते. हे महाराष्ट्राचे धर्मक्षेत्रातले नेते ! धर्म म्हणजे काय हे समजण्याचीसुद्धा त्यांना पात्रता नव्हती.

जर्मन पंडित जॉली
 प्रसिद्ध जर्मन पंडित ज्यूलियस जॉली म्हणतो, 'हिंदुधर्मशास्त्र रचणारे हे निबंधकार, परिस्थिती पाहून कधी लिहीत नसत. या शास्त्राचा वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. भोवतालच्या जगातील व्यवहारापासून ते अगदी अलिप्त असत. हिंदुराज्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असताना, हे शास्त्रीपंडित पाल अंगावर पडली तर कोणते प्रायश्चित्त द्यावे, या विचारात गर्क होते.' (विश्वरूप या निबंधकारावरचा जॉलीचा लेख, जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, १९२४, २५, २६, व्हॉल्यूम ३ व ४ )
 धर्माची प्रवृत्ती मूलतः मानवाच्या मनोविकासासाठी, त्याच्या उन्नयनासाठी, त्याच्या गुणोत्कर्षासाठी झालेली असते. पण या धर्माच्या अंतिम हेतूचा विसर पडला की