पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२९६
 

प्रज्ञा, विचारशक्ती, चिंतनशक्ती, निर्णयशक्ती या सर्वाची या शास्त्रीपंडितांच्या मूढ धर्माने हत्या केली आहे.
 या धर्मग्रंथांत वारंवार असे सांगितलेले आढळते की हा धर्म, ही व्रते, हे विधी, हे यमनियम सर्व वर्णासाठी सांगितलेले आहेत आणि व्यवहारात सर्व हिंदुसमाज हे यमनियम भक्तीने व भीतीने काटेकोरपणे पाळतो हे आपण पाहतोच. रामनवमी, अक्षय्य तृतीया, वटसावित्री, चतुर्मास, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरितालिका, अनंतव्रत, नवरात्र-घटस्थापना, दसरा, संक्रांत, शिवरात्री ही व्रते आणि पितृपंधरवड्यातील श्राद्धपक्ष, ग्रहणातील सोवळे-ओवळे, सोयरसुतकाचे नियम - हे सर्व शास्त्र हिंदुसमाज गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत किती निष्ठेने पाळीत होता हे सर्वांना माहीतच आहे. व्रते, श्राद्धपक्ष, अशौच यांविषयी सांगितलेले हे सर्व शास्त्र अर्थशून्य, तर्कहीन, जड- मूढ, विवेकशून्य व त्यामुळेच अत्यंत वेडगळ असे आहे.

रामनवमीचे शास्त्र
 रामनवमी हे व्रत सर्व हिंदूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी त्या प्राचीन पितृनिष्ठ, एकपत्नी, एकवाणी, एकवचनी, महाधनुर्धर अशा महापुरुषाचे स्मरण करावे, कीर्तन करावे, आणि त्याचा ध्येयवाद, त्याचा क्षात्रधर्म, त्याचे बंधुप्रेम या गुणांचे संस्कार आपल्या मनावर करावे, हा या व्रताचा मुख्य हेतू. पण धर्मशास्त्रज्ञांनी त्याला कसे जड रूप दिले आहे पाहा. ही चैत्रातील नवमी अष्टमीयुक्त असावी असे एक मत. नसावी असे दुसरे मत. त्यात स्मार्तांना एक नियम, वैष्णवांना दुसरा. हे व्रत करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? तर उपोषण व जागरण, जो मूर्ख मनुष्य रामनवमीस उपोषण करीत नाही- म्हणजे या लहरी शास्त्रज्ञांनी नेमून दिलेले पदार्थ खात नाही, जो अज्ञानाने का होईना पण भोजन करतो- म्हणजे तांदूळ, गहू, मसुरा, चवळ्या हे पदार्थ खातो- तो कुंभीपाक नरकात पडतो. हे व्रत न करता कोणी अन्य व्रते केली तरी त्या व्रतांचे फल त्यांना मिळणार नाही. आणि या व्रताचा सर्व भर कशावर तर मसुरा, चवळ्या, दूध, फळे यांच्या भक्षणाभक्षणावर. अज्ञानामुळे जरी वर्ज्य पदार्थ पोटात गेले, किंवा चुकीच्या तिथीला व्रत केले गेले तरी, नरक ठेवलेलाच.

चवळ्या मसुरा-धर्म !
 वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्यतृतीया अथवा अखेती हिचे बहुजनात फारच माहात्म्य आहे. पण ही तृतीया द्वितीयायुक्त असता कामा नये. अशी पूर्वविद्धा तृतीया भक्तीने केली तरी ती पूर्वीच्या सर्व पुण्याचा नाश करते. वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठी पौर्णिमेस असते. ही पोर्णिमा चतुर्दशीयुक्त असावी. पौर्णिमेच्या इतर व्रतांना चतुर्दशीयुक्त पौर्णिमा निषिद्ध होय. पण सावित्री व्रताला ती योग्य होय. कारण स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्त, मदनरत्न यांत तसे वचन आहे. या पौर्णिमेस दान दिल्याचे फलही मोठे आहे.