पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९७
शास्त्री पंडित
 

तिलदान केले तर अश्वमेधाचे पुण्य मिळते व छत्री, जोडा इ. दान दिल्यास पुरुषाला राज्य प्राप्त होते. चातुर्मास्य हे व्रत चार वर्णांच्या चारही आश्रमांतल्या मनुष्यास नित्य होय. या व्रताचा आत्मा कशात आहे ? काही पदार्थ खाणे व काही वर्ज्य करणे यात ! पहिल्या महिन्यात भाज्या वर्ज्य, दुसऱ्यात दही, तिसऱ्यात दूध व चौथ्यात द्विदल धान्य वर्ज्य. व्रताचे हे सर्वसाधारण रूप सांगून मग कमलाकर भट्टाने भिन्नभिन्न पंडितांच्या आधारे वांगे, चवळ्या, बोरे, ऊस, मसुरा, मोहऱ्या, पडवळ, मुळा, यांविषयी गंभीरपणे चर्चा केली आहे. त्या त्या काळात उत्पन्न होणाऱ्या शाका वर्ज्य असे एक मत आहे. पण यावरून आधीच्या वर्षी सुकवून ठेवलेल्या शाका चालतील, असे कोणाला वाटेल. पण तसे नाही. त्याही निषिद्धच होत. मग चातुर्मास्यात खावे काय ? हविष्य खावे. कोणते ? तांदूळ, मूग, तीळ, वाटाणे, चंदनबटवा, चाकवत, मुळा, गायीचे दूध व तूप, फणस, आंबा, नारळ, केळे, पिंपळी, जिरे ही सर्व हविष्ये होत. यांच्या सेवनाने पुण्य प्राप्त होते. उलट वांगे, उंबर, द्विदल धान्ये इ. पदार्थ पोटात गेल्यास हरी दूर होतो. हेमाद्रीने इतरही व्रते व त्यांची फळे सांगितली आहेत. गूळ वर्ज्य केल्यास मनुष्य मधुरस्वरी राजा होतो, तेल वर्ज्य केल्याने सुंदरांग होतो. कटुतैल वर्ज्य केल्याने शत्रुनाश होतो. भूमीवर किंवा दर्भावर निजणारा मुनिश्रेष्ठ ब्राहाण होतो. मौनव्रत जो पाळील त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते. जो भूमीवर भोजन करील तो पृथ्वीपती होईल ! ही व्रते करणारांनी ब्राह्मणांस दाने कोणकोणती द्यावी हेही हेमाद्रीने सविस्तर सांगितले आहे.
 नवरात्र व्रत हे अखिल भारतात रूढ आहे. त्याचा महिमा व त्याचे यमनियम काय आहेत ? नवरात्रात देवीची पूजा करावयाची असते. त्या देवीने स्वतःच सांगितले आहे की द्वितीयायुक्त प्रतिपदेस माझ्या पूजनास प्रारंभ करावा. अमावास्यायुक्त प्रतिपदेस प्रारंभ केला तर त्या मनुष्याला मी शाप देऊन भस्म करीन. जो आग्रहाने अमायुक्त प्रतिपदेस कलशस्थापना करील त्याच्या संपत्तीचा नाश होईल व त्याचा ज्येष्ठ पुत्र मृत्यू पावेल !

तिथितत्त्व
 या व्रतांच्या प्रतिपादनात ब्रह्मचर्य, उपोषण, कथाश्रवण यांचा उपदेश मधून मधून केला जातो. नाही असे नाही. पण महत्त्व सगळे आहे ते तिथीला, खाण्यापिण्याला, सोवळ्या-ओवळ्याला. लल्ल या पंडिताचे पुढील वचन कमलाकरभट्टाने उद्धृत केले आहे. 'व्रताचे तिथी हेच शरीर, तिथी हेच कारण, तिथी हेच प्रमाण होय. ज्या कर्मास जी तिथी सांगितली आहे तीच स्वीकारली पाहिजे.' व्रतवैकल्ये हा जड धर्म कसा ते यावरून कळेल. भक्तिभावनेला त्यात महत्त्व नाही. तिथी चुकली तर भक्तीने केलेल्या व्रताचे पुण्य तर मिळत नाहीच, उलट मागल्या सर्व पुण्याचा नाश होतो. तिथी किंवा इतर नियम अज्ञानाने मोडले तरी क्षमा नाही. नरक टळणार नाही. आणि