पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९५
शास्त्री पंडित
 

 व्रते, उत्सव, श्राद्धपक्ष यांमध्ये मनुष्याच्या हातून देवपूजा किंवा पितृपूजा घडावी, हरिकीर्तन, भगवद्भजन घडून मनाची उन्नती व्हावी, त्याच्या खाण्यापिण्यावर, एकंदर वर्तनावर बंधने पडून त्याला मनोनिग्रहाचे, संयमाचे शिक्षण मिळावे, असा हेतू असणे शक्य आहे. तसा तो असेल तेथे व्रते समाजाला निश्चित उपकारक होतील. पण आपल्या धर्मशास्त्रज्ञांनी या व्रतोत्सवाला इतके जड रूप दिले आहे की त्यातून हे हेतू, ही उद्दिष्टे दिसतच नाहीत.

गाजर मुळा-धर्म
 कालनिर्णयाप्रमाणेच खाणेपिणे, शरीरशुद्धी यांतील वर्ज्यावर्ज्य हे प्रकरण आहे. व्रते, उत्सव, श्राद्धपक्ष यांमध्ये मनुष्याच्या हातून देवपूजा घडावी, पितृपूजा व्हावी, पूर्वजांचे स्मरण व्हावे हा हेतू मुळात असावा. पण शास्त्रीपंडितांनी या व्रतवैकल्यांना इतके जड रूप दिले आहे, त्यांतील कर्मकांडावर इतका भर दिला आहे की हा मूळ उद्देश त्यात लोपून जातो. 'तिथितत्त्व', 'कृत्यकल्पतरू', 'निर्णय सिंधू' इ. ग्रंथांत प्रत्येक तिथीला काय खावे व काय खाऊ नये, कोणते पदार्थ व कृत्य वर्ज्य करावे आणि तसे न केल्यास कोणते पाप लागते, याच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत.
 पुढे रामनवमी, अक्षय्य तृतीया इ. व्रतांचे, या शास्त्रपंडितांनी सांगितलेले यमनियम दिले आहेत. त्यावरून खाण्यापिण्यावरच सर्व धर्म त्यांनी कसा उभारला होता, हे कळून येईल. या व्रतांची उदाहरणे देण्यात आणखी एक हेतू आहे. ही व्रते महाराष्ट्रातील व भारतातील बहुजनसमाज अत्यंत निष्ठेने पाळतो. पण तो त्यातील काटेकोरी कितपत संभाळू शकेल याचा वाचकांनीच विचार करावा. सर्व समाजासाठी, चारही वर्णाच्यासाठी, जी व्रते सांगितली त्यांच्या बाबतीत तरी यमनियम सैल करावे, हे व्यवहारी धोरण सुद्धा, शास्त्री पंडितांनी संभाळले नाही. आणि त्यांनाही कायम नरकात धाडण्याची व्यवस्था करून ठेवली. कारण तिथींविषयी, गाजरमुळ्यांविषयी लवमात्र जरी चूक झाली तरी नरक अटळ आहे! आणि शास्त्रीपंडितांनी घालून दिलेले नियम पाहिले की चूक झाल्यावाचून एखादे व्रत करणे अशक्य आहे हे सहज दिसून येईल.

त्याचा प्रभाव
 शास्त्रीपंडितांच्या या धर्माचा बहुजन समाजाशी फारसा संबंध नव्हता, असा एक समज रूढ आहे. पण तो खरा नाही. ज्ञानेश्वर, नामदेव इ. वारकरी पंथाच्या संतांनी या कर्मकांडात्मक धर्मावर प्रखर टीका केली, हे खरे. पण त्या टीकेमुळे या धर्माचे समाजमनावरचे वर्चस्व कमी झाले नाही. संतांच्या आधीच्या काळापासून इंग्रजी राज्याच्या प्रस्थापनेपर्यंत, येथल्या समाजाची मने या जड धर्माच्या शृंखलांनी अगदी दृढबद्ध होती आणि अजूनही ती पूर्ण मुक्त झाली आहेत, असे नाही. तशी ती मुक्त झाल्यावाचून या देशाची द्रुत गतीने प्रगती होणे शक्य नाही. कारण मानवाची बुद्धी,