पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९३
शास्त्री पंडित
 

नाही. व्रते -वैकल्ये, श्राद्ध पक्ष, सोवळे-ओवळे, प्रायश्चित्ते यांतच, या शास्त्रीपंडितांच्या मते, सर्व धर्म साठविला होता.
 यादवकाळाचे विवेचन करताना हेमाद्रीच्या व्रतवैकल्यप्रधान धर्माचे राजवाडे यांनी वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे संतप्रणीत धर्माचे स्वरूप वर्णिताना संतवाङ्म- याच्या अनेक अभ्यासकांनीही यादवकाळातील कर्मकांडात्मक धर्माचे स्वरूप, तुलनेसाठी म्हणून, वर्णिले आहे. पण तेवढ्यावरून वर निर्देशिलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप नीटसे ध्यानात येणार नाही. आणि या शास्त्रामुळे समाजमनावर अत्यंत हीन संस्कार होऊन त्याचा किती प्रकारे अधःपात होत होता तेही कळणार नाही. म्हणून शास्त्री- पंडितांच्या त्या धर्माचे जरा तपशिलाने वर्णन करणे अवश्य आहे.

शुभाशुभ काल
 प्रथमतः या धर्मशास्त्रातील 'कालनिर्णय' हे प्रकरण पाहा. एकादशी, शिवरात्र हे उपवास, कृष्णाष्टमी, रामनवमी हे उत्सव, किंवा हरतालिका, ऋषिपंचमी ही व्रते (धर्मग्रंथांत या सर्वाना व्रते असेच म्हटले आहे ) करण्यास सांगितली, तर त्यात काही बिघडते असे नाही. उलट या आचारांच्या निमित्ताने मनावर धर्माचे संस्कार होतात व समाजाची उत्सवाची हौसही भागते. पण हे इतके साधे स्वरूप या व्रतांचे नाही. कोणते व्रत कोणत्या तिथीला करावे, हे सांगताना धर्मशास्त्रज्ञ निश्चित कालाचे महत्त्व सांगतात व ते सांगताना कालनिर्णयाची अशी काही चिकित्सा करतात की व्रतांचा मूळ उद्देश बाजूला राहून त्यांना अगदी विचित्र, विकृत रूप प्राप्त होते.
 व्रते अमक्याच तिथीला केली पाहिजेत, असे शास्त्र आहे. पण पुष्कळ वेळा दिवसाच्या प्रारंभी एक तिथी असते व थोड्या वेळाने ती संपून दुसरी सुरू होते. अशा वेळी काय करावे, हा प्रश्न धर्मशास्त्राला मोठा गंभीर वाटतो आणि अशा वेळी निर्णय करताना शास्त्रज्ञ अत्यंत विवेकहीन होतात. हरतालिका व्रत तृतीयेला असते. त्याबद्दल शास्त्र असे आहे की जी तृतीया चतुर्थीयुक्त असेल ती घ्यावी. द्वितीयायुक्त असेल ती वर्ज्य मानावी. असे का ? शास्त्र म्हणते की 'द्वितीयायुक्त तृतीयेला जी स्त्री हरतालिका- व्रत करील तिला वैधव्य प्राप्त होईल !' हे कशावरून ? तर 'असे आपस्तंब म्हणतो म्हणून. क्षणमात्र जरी द्वितीया त्या दिवशी असली तरी ती वर्ज्य, असे स्कांदवचन आहे म्हणून.' (निर्णयसिंधू, निर्णयसागर छापखाना, इ. स. १९२५, पृ. १४६) एकादशी व्रताविषयी असेच आहे. सकाळी प्रथम थोडी दशमी असेल, म्हणजे एकादशी दशमी-विद्धा असेल, तर ती वर्ज्य करावी. गांधारीने दशमी-विद्धा एकादशी केल्यामुळे तिचे शंभर पुत्र युद्धात मरण पावले. मात्र दशमी विद्धा-एकादशी वैष्णवांना फक्त वर्ज्य आहे. स्मार्ताना ती चालेल. असे का ? तर 'गरुड पुराणात तसे म्हटले आहे म्हणून.' आणि ' दशमीविद्धा एकादशी केली तर तीन जन्मांचे पुण्य नष्ट होते, असे नारद पुराण म्हणते म्हणून ती वैष्णवांना वर्ज्य.' नवरात्रात