पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८९
मराठा सरदार
 

वैपुल्य व सौलभ्य कोठे, किती होते, हिंदुस्थानवर ज्यांनी आक्रमणे केली ते सर्वच लोक दरिद्री देशांतून आले होते काय, याविषयी त्यांनी कोठेही कसलीही प्रमाणे दिलेली नाहीत. शिवाय एक अन्नवैपुल्य असले की मनुष्याला इतर कसल्याही आकांक्षा नसतात या आपल्या सिद्धांताचा त्यांनी केवळ विधाने करण्यापलीकडे, कसलाही प्रपंच केलेला नाही. धर्म, वंश, राष्ट्र, राज्य, साम्राज्य इ. कितीतरी प्रेरणा मनुष्याला, अन्नवैपुल्य असले तरी किंवा नसले तरी, पराक्रमाला उद्युक्त करीत असतात याचा राजवाडे विचारही करीत नाहीत. ज्या वेळी जे सुचेल ते दडपून देणे एवढेच त्यांचे धोरण असे. ऐतिहासिक चर्चेत त्याला स्थान देणे युक्त नाही.
 बहामनी कालातील महाराष्ट्रातल्या मराठा सरदारांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा येथवर विचार केला. या सरदारांची घराणी अव्वल क्षत्रियांची होती. ती पराक्रमी होती. भोसल्यांचे घराणे तर विशेष पराक्रमी होते. असे असूनही, तीनशे वर्षांच्या काळात, त्यांना स्वतंत्र राज्ये स्थापिता आली नाहीत विजयनगरच्या राज्यकर्त्यांना जे पंधरावीस वर्षांत जमले ते यांना तीनशे वर्षात साधले नाही. माझ्या मते, याचे कारण एकच. या घराण्यातील थोर पुरुषांना क्षात्रधर्माचा विसर पडला हे ते कारण होय. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे त्यांनी जाणले नाही. शिवछत्रपतींनी ते जाणले होते. यामुळेच विजयनगरच्या सम्राटाप्रमाणेच त्यांनी, अत्यंत अल्पावधीत, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
 महाराष्ट्रातल्या सरदार घराण्यांची जी स्थिती होती तीच महाराष्ट्रातल्या शास्त्री - पंडितांच्या घराण्यांची होती. वेद, उपनिपदे, रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांत वसिष्ठ, विश्वामित्र, व्यास, वाल्मीकी, श्रीकृष्ण, वेदव्यास, भीष्म यांनी सांगितलेल्या थोर धर्माचे आकलन करण्याची पात्रताच त्यांच्या ठायी नव्हती. श्राद्ध, पक्ष, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, यालाच ते धर्म समजत. त्यामुळे स्वराज्य व स्वधर्म ही अविभाज्य आहेत या थोर सत्याचा त्यांना विसर पडला. त्यामुळे हे दुसरे नेतृत्वही महाराष्ट्राचा उत्कर्ष साधण्यास असमर्थ ठरले. पुढील प्रकरणात या शास्त्रीपंडितांच्या नेतृत्वाचा विचार करू.