पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८७
मराठा सरदार
 

राधामाधव-विलासचंपूच्या प्रस्तावनेत शहाजीला इतर मराठा सरदारांनी साह्य का केले नाही, त्यांनी स्वतंत्र पराक्रम करून स्वराज्य स्थापना का केली नाही याची चर्चा करताना राजवाडे म्हणतात, 'फलटण, जत, मुधोळ, सावंतवाडी, जावळी येथले मराठे हे शहाजीप्रमाणेच उच्च मराठे होते व या देशाचे तेच स्वभावसिद्ध नायक होते. तरी ते निर्माल्यवत निस्तेज व सुस्त राहिले. याचे कारण असे की त्यांच्या ठायी राष्ट्रभावना नव्हती. उत्तम फौजफाटा उभारण्याचे कर्तृत्व त्यांच्या ठायी नव्हते, उठावणी केली, तर आहे हीच धनदौलत जाईल, ही त्यांना भीती होती. त्यांचे सल्लागार भट- भिक्षुक होते व कारागिर हत्यारे पैदा करण्याची त्यांना अक्कल नव्हती !' (राधामाधव, पृ. १२४-२५) एखादा साधा परदेशातून आलेला मुसलमान गुलाम किंवा येथलाच बाटून मुसलमान झालेला भटभिक्षुक जे करू शकतो ते या उच्च मराठ्यांना करता आले नाही ! तरी कर्तृत्व रक्तावर, वंशशुद्धीवर अवलंबून असते हा आग्रह सोडण्यास राजवाडे तयार नाहीत. पण आपणांस ऐतिहासिक सत्य पहावयाचे असल्यामुळे त्यांच्या उपपत्तीचा क्षणमात्रही स्वीकार करता येणार नाही.

आर्थिक उपपत्ती
 मराठ्यांच्या नाकर्तेपणाची राजवाडयांची दुसरी उपपत्ती म्हणजे आर्थिक उपपत्ती. महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत, उत्तर कोकणातील लोकांच्या कर्तृत्वाचे विवेचन करताना, प्रथम त्यांनी ती मांडली. व नंतर पुढील विवेचनात, अखिल महाराष्ट्रीय लोकांना व अखिल भारताला तो सिद्धान्त लावून टाकला. उत्तर कोकणात पहिली वसाहत कातवड्यांची होती. नंतर तेथे नाग, वारली, कोळी व ठाकर यांनी वसती केली. त्यांच्या मागून पुढील दोन हजार वर्षांत महाराष्ट्रिक, आंध्र, मांगेले, नल, मौर्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, मुसलमान, पोर्तुगीज व मराठे यांनी तेथे जाऊन राज्ये स्थापन केली. या घडामोडीत दर वेळी पूर्व समाजाची सत्ता नवेनवे वसाहतवाले हिरावून घेत. पण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नवीन आक्रमकाला कधीच विरोध केला नाही. असे का झाले ? आक्रमकांशी त्यानी झुंज का दिली नाही ? राजवाडे म्हणतात, अन्नवैपुल्य व अन्नसौलभ्य हे त्याचे कारण आहे.

अन्नवैपुल्य
 सह्याद्रीमध्ये कोकणच्या रानात व समुद्र किनाऱ्याला विपुल अन्न होते. त्यामुळे, राजवाड्यांच्या मते, जुने वसाहतकार व नवे आक्रमक यांच्यात संघर्ष होण्याचे कारणच नव्हते. सगळा झगडा व्हावयाचा तो अन्नासाठी. पण उत्तर कोकणात तेच इतके विपुल होते की कोणीही तेथे यावे व निराळी वसाहत करून सुखाने पोट भरावे. एकमेकांना ठार मारले तरच जगता येईल, अशी स्थिती असेल, तेथे राज्य, साम्राज्य, शस्त्रास्त्रे, सैन्य, संघटना या कल्पना उद्भवतात. पण कोकणात उद्भिज व प्राणिज