पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२८६
 

पारतंत्र्य नष्ट झाले. कारण भोसले हे अस्सल क्षत्रिय व महाराष्ट्रीय असे होते. चालुक्य यादवांप्रमाणे परकीय नव्हते (राधामाधव, पृ. १९१-९३ ).

कल्पनाजाल
 राजवाडे यांच्या या उपपत्तीतील मुख्य वैगुण्य म्हणजे तिला कसलाही आधार नाही. ते त्यांचे कल्पनाजाल आहे. येथील पाटील, देशमुख, सरदेशमुख ही उत्तरेतील क्षत्रियांची शूद्रभावोत्पन्न संतती असे म्हणण्यास काहीही पुरावा नाही. शिवाय त्या कालात अनुलोम विवाह पूर्ण मान्य असल्यामुळे क्षत्रियभार्योत्पन्न संततीपासून शूद्रभार्योत्पन्न संतती वेगळी काढली जात होती असे नाही. सर्वांची गणना क्षत्रियवर्णातच होत असे. त्यामुळे दक्षिणेत आलेले राष्ट्रिक, महाराष्ट्रिक हे शूद्रभार्योत्पन्न होते असे म्हणण्यास कल्पनेवाचून दुसरा आधार नाही तेव्हा चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांपासून मराठे हे वंशाने किंवा रक्ताने निराळे होते असे म्हणणे निराधार आहे. चालुक्य - यादव यांना परकी म्हणणे हे असेच तर्कदुष्ट आहे. ते उत्तरेतून आले हे खरे. पण हे नागमहाराष्ट्रोत्पन्न मराठेही उत्तरेतूनच आले होते. चालुक्य यादव हे जर परकीय असतील तर हेही तितकेच परकीय म्हणावे लागतील. चालुक्य यादवांपासून भोसले यांना निराळे काढणे यात तर कसलीच तर्कसंगती नाही. तेही उत्तर हिंदुस्थानातूनच आले होते असे राजवाडे यांचे मत आहे. कोणते घराणे प्राचीन काळी दक्षिणेत आले व कोणते अर्वाचीन काळी, हे ठरविण्यास कसलाही पुरावा उपलब्ध नाही. आणि किती शतके एखाद्या भूप्रदेशात वसती केल्यावर घराणी स्वीय होतात, याचे काहीही गणित ठरलेले नसल्यामुळे, मराठ्यामराठ्यांत कसलाही फरक करता येणार नाही, आणि चालुक्य यादवांच्या काळात मराठे पारतंत्र्यात होते व भोसल्यांच्या काळात ते स्वतंत्र झाले या म्हणण्यात काही अर्थ नाही आणि अशा रीतीने नागमहाराष्ट्रोत्पन्न क्षत्रिय व महाराष्ट्र क्षत्रिय हा भेदच निराधार ठरल्यानंतर मराठ्यांच्या कर्तृत्वाविषयी राजवाड्यांची उपपत्ती कोसळून पडते.

वंशशुद्धीचा आग्रह
 आणि ती क्षणभर खरी मानली तरी शूद्ररक्तसंकरामुळे हे मराठे कर्तृत्वहीन झाले या राजवाड्यांच्या म्हणण्याला कसलाही अर्थ नाही. महाराष्ट्राचे पहिले स्वीय राजघराणे म्हणजे सातवाहनांचे. सातवाहन हे राजवाडे यांच्याच मते शूद्र होते. तरी त्यांनी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य केले व माळव्यापासून रामेश्वरापर्यंत साम्राज्य विस्तारले. विद्या, कला, शास्त्र यांच्या जोपासनेविषयी सातवाहनांची जेवढी कीर्ती आहे तेवढी दुसऱ्या कोणाची नसेल. इ. पू. चौथ्या शतकात मगधात साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त मौर्य हा पुराणांच्या मते शूद्रच होता, त्याचा नातू अशोक हाही अर्थात शूद्रच होता. पण त्याचे ते शूद्रत्व त्याच्या कर्तृत्वाला मारक झाले नाही.