पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२८४
 

ऋषींचे रक्षण केले. त्या अप्रमेय अशा विष्णूने शत्रूचा असा वध केला नसता तर ब्राह्मण जिवंत राहिले नसते, लोक राहिले नसते, आदिकर्ता भगवान ब्रह्मदेवही शिल्लक राहिला नसता, हा धर्म राहिला नसता व सनानत आर्यधर्मही राहिला नसता. मागे शाश्वत धर्माचा लोप झाला असताना, क्षात्रधर्माच्या योगानेच त्याची अभिवृद्धी झाली. आदिधर्म प्रत्येक युगात प्रवृत्त होतात. पण क्षात्रधर्म हाच सर्व लोकांत श्रेष्ठधर्म होय.' (शांति ६४-२३, २४) क्षात्रधर्माचे हे रामायण-महाभारतप्रणीत लक्षण पाहिले म्हणजे निंबाळकर, घाटगे, भोसले हे सरदार आपला धर्म विसरले होते या म्हणण्याचा अर्थ ध्यानात येईल. बहामनी काळाच्या प्रारंभापासूनच हिंदुसंस्कृती, हिंदुधर्म व हिंदुजनता यांचा समूळ उच्छेद करण्याचा उद्योग मुस्लिम सुलतानांनी प्रारंभिला होता. त्यांच्या या उद्योगाचे सविस्तर वर्णन मागे केलेच आहे. सर्व हिंदुप्रजा अनाथ व दीन झाली होती. अशा वेळी त्या अविंध सत्तेच्या जुलमापासून तिचे व तिच्या धर्माचे, तिच्या सत्त्वाचे रक्षण करणे हाच या सरदारांचा धर्म होता.

आत्मत्यागः सर्वा भूतानुकंपा, लोकज्ञानं पालनं मोक्षणं च ।
विपण्णानां मोक्षणं पीडितानां, क्षात्रे धर्मे विद्यते पार्थिवानाम्

(शांति ६४-२६)

स्वार्थत्याग, सर्व प्राणिमात्रांविषयी अनुकंपा, राष्ट्राविषयी पूर्णज्ञान, लोकांचे पालन, संकटग्रस्तांना मुक्त करणे, गांजलेल्यांची पीडा दूर करणे ही क्षात्रधर्मनिष्ठ राजाची कर्तव्ये होत.

साक्षात्कार नाही
 मराठा सरदारांना स्वराज्यस्थापना का करता आली नाही याचे कारण वर सांगितले. ते क्षात्रधर्म विसरले होते, स्वराज्य व स्वधर्म ही अविभाज्य आहेत याची जाणीव त्यांना नव्हती, हे ते कारण होय. कर्नाटकात हरिहर आणि बुक्क यांना स्वराज्य- स्वधर्म यांच्या अद्वैताचा साक्षात्कार होताच त्यांनी १५-२० वर्षांत, मुस्लिम आक्रमणाचा निःपात केला आणि स्वधर्माचे रक्षण केले. महाराष्ट्रात मराठा सरदारांना हे साधले नाही याचे कारण हेच की त्यांना हा साक्षात्कार झाला नाही. त्यांना यवनसेवेचा साक्षात्कार होत असे. शिवछत्रपतींना क्षात्रधर्माची जाणीव होताच त्यांनी अत्यंत अल्प अवधीत, अगदी अल्प वयात हे कार्य करून दाखविले. यावरून अन्वय- व्यतिरेकाने हे सिद्ध होते की राजधर्मनिष्ठेच्या अभावामुळेच मराठा सरदार पारतंत्र्यात खितपत पडले होते.
 बहामनी काळातील महाराष्ट्र समाजात नेत्यांचे वर्ग होते, असे प्रारंभी सांगितले आहे. मराठा सरदार, ब्राह्मण शास्त्रीपंडित आणि संत हे ते तीन वर्ग होत. यांपैकी मराठा सरदारांच्या नेतृत्वाचा विचार येथवर केला. क्षात्रधर्माचा लोप या कारणामुळे हे नेते समाजरक्षण व धर्मरक्षण करण्यात अपयशी झाले असा निष्कर्ष त्यातून