पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८३
मराठा सरदार
 

शौर्यधैर्य प्रगट करून विजय मिळविणे एवढ्यालाच ते क्षात्रधर्म मानीत, रजपुती बाणा समजत. हा पराक्रम स्वधर्मरक्षणासाठी, प्रजापालनासाठी, लोकरक्षणासाठी, करावयाचा असतो; त्या ध्येयाने, त्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन केलेला जो पराक्रम त्यालाच क्षात्रधर्म म्हणतात हे त्यांच्या स्वप्नातही आले नाही. हे सर्व सरदार धर्मनिष्ठ होते. शिव, राम, विठ्ठल यांचे उपासक होते. पण हा व्यक्तिनिष्ठ धर्म झाला. हा राजधर्म नव्हे. त्यांना आपल्या राजधर्माची जाणीव असती तर पिढ्यानपिढ्या ते या देशाचे, धर्माचे, संस्कृतीचे जे शत्रू मुसलमान, त्यांची सेवा करीत, व हिंदुराजांची राज्ये नष्ट करण्यात भूषण मानीत राहिले नसते. त्यांची शिवभक्ती, रामभक्ती, त्यांची एकादशी, त्यांच्या तीर्थयात्रा या मुस्लिम सेवेच्या आड येत नव्हता. याचाच अर्थ असा की त्यांचा धर्म हा वैयक्तिक धर्म होता. स्वतःचा समाज, स्वदेश, स्वजन यांच्या उत्कर्षाची चिंता ही त्या धर्मात अंतर्भूत होत नव्हती.

क्षात्रधर्म
 हे सरदार रामायण, महाभारत कथा - कीर्तनात ऐकत असतील; पण त्यातील राजधर्माच्या तत्त्वज्ञानाचे कसलेही संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत. 'अनाथ होऊन, पीडित होऊन लोकांना रडत बसण्याची पाळी येऊ नये, एवढ्याकरिता क्षत्रियांनी धनुष्य धारण करावयाचे असते. '

क्षत्रियैर्धायते चापो नार्तशब्दो भवेदिति । रामायण ३|१०|३
दुर्बलस्य त्वनाथस्य राजा भवति वै वलम् । ७।५९।२३

'अनाथ, दुर्बल यांचे राजा हे बल होय' अशा तऱ्हेची अनेक वचने रामायणात आहेत. महाभारतात तर राजधर्मावर स्वतंत्र पर्वच आहे. 'क्षत्रियाला शत्रूच्या नाशावाचून दुसरा धर्म नाही', ( उद्योग २१ - ४३ ) 'राज्य जिंकण्याच्या कामी कोणी अडथळा करील तर त्याचा वध करणे हा क्षात्रधर्म होय,' ( शांति १०-७ ) असा उपदेश ठायी ठायी महाभारतात आहे. वेद व्यासांच्या मते राजधर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म होय. पंढरीची वारी, व्रते, तीर्थयात्रा, अनुष्ठाने हा सर्व गौण धर्म होय. भीष्म म्हणतात-

यथा राजन् हस्तिपदे पदानि संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान् सर्वावस्थं संप्रलीनान् निबोध ॥

(शांति ६३ - २५ )

'हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो, हे तू निश्चित समज.'
 राजा मांधाता यास उपदेश करताना, सुरेश्वर इंद्राने पुढील विवेचन केले आहे. 'श्रीविष्णूने पूर्वी क्षात्रधर्माचाच अवलंब करून शत्रूंचा निःपात केला व देवांचे आणि