पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२८०
 



आयुष्याच्या अखेरीस ही
 विजापूरच्या आदिलशाहीतही राजांचे अपमान टळले नाहीत. जिंजीच्या वेढ्याच्य वेळी ते कुचराई करीत आहेत असा संशय येऊन मुस्ताफाखानाने, बाजी घोरपड्याच्या करवी राजांना कैद केले. त्याआधीच त्यांनी कुतुबशाहीच्या आश्रयास जावयाचे ठरवून, शहाकडे तसा अर्जही केला होता. शिवछत्रपतींच्या राजकारणी डावामुळे राजांची सुटका झाली व ते बंगलोरला गेले. तेथे कर्नाटकात त्यांनी फार मोठा पराक्रम करून आदिलशहाचे राज्य वाढविले. असे असूनही, १६६३ साली राजांच्या मृत्यूच्या आदल्याच वर्षी, बंकापूरच्या वेढ्याच्या वेळी, अली आदिलशहाने या वयोवृद्ध सरदाराच्या पायांत बेड्या ठोकल्या ! आणि तरीही बेडी निघाल्यावर राजे आदिलशाहीच्या राज्याचा विस्तार करण्याचे कार्य करीत राहिले.
 (२) शहाजी राजांनी दक्षिणेतील सर्व हिंदू राज्ये बुडविली. तो इतिहास पाहतानाही इतिहास पंडितांच्या मताविषयी शंका येते.

हिंदू राज्ये
 राजे १६३६ साली विजापूरच्या आश्रयास आले आणि पुढील चार वर्षांत त्यांनी कर्नाटक प्रांतावर तीन स्वाऱ्या केल्या. या तीन स्वाऱ्यांत त्यांनी वीरभद्राचे श्वकेरीचे राज्य, केंपगौडा याचे बंगलूरचे राज्य, वोडियार याचे श्रीरंगपट्टणचे राज्य आणि बसवपट्टण कांदळ, बाळापूर येथील नायकांची राज्ये बुडविली ही राज्ये का बुडविली ? महंमदशहाचा सक्त हुकूम होता की 'कर्नाटकातील सर्व हिंदू सत्ताधीशांस जिंकून, त्यांचा प्रदेश हस्तगत करावा, हिंदुधर्माचा पाडाव करून मुसलमानी धर्म वाढवावा आणि संपत्ती लुटून विजापुरास आणावी.' आणि या स्वाऱ्यानंतर त्यांनी प्रौढी मिरविली की 'आम्ही सर्व राजे महाराजे जिंकले, मोठमोठी मंदिरे धुळीस मिळविली, सेतुबंध रामेश्वराची भक्ती करणाऱ्या हिंदूंच्या शेंड्या कापल्या आणि काफरांचे निर्मूलन केले.'
 पुढील दीर्घ काळात शहाजी राजांनी चंडगिरीचा श्रीरंगराय वेदनूरचा शिवाप्पा नायक यासारख्यांना पुनः पुन्हा जिंकून, त्यांचे, आपापली हिंदू राज्ये स्वतंत्र राखण्याचे प्रयत्न संपूर्णपणे हाणून पाडले. १६६३ साली त्यांना बेड्या घातल्या गेल्या. या घोर अपमानानंतरही त्यांनी वेदनूरच्या नायकास जिंकून आदिलशहाला संतुष्ट केले; त्यानेही वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे पाठवून त्यांचा गौरव केला.
 १६४० ते १६६४ या चोवीस वर्षाच्या काळात दक्षिणेतील हिंदू नायक राजे आणि श्रीरंगरायांसारखे विजयनगरचे वारसदार यांनी मुस्लिम सत्तेशी फार चिवटपणे लढा दिला. या काळात त्यांना शहाजी राजांसारखा महापराक्रमी, कुशल नेता मिळाला असता तर कृष्णेच्या दक्षिणेस स्वतंत्र हिंदुपदपातशाही स्थापन झाली असती. पण