पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७९
मराठा सरदार
 

स्वतंत्र होण्याची केवढी उत्तम संधी होती ! मोगलांनाही व आदिलशालाही पाणी पाजण्याचे सामर्थ्य त्यांनी नुकतेच प्रकट केले होते. डोंगराळ मुलखात पठाणी किंवा इतर मुस्लिम सरदार जाण्यास धजत नसत. राजे स्वतः पंचहजारी सरदार पूर्वीच झाले होते. यांपैकी कोणतीच पुण्याई गाठी नसताना, शिवछत्रपतींनी त्याच प्रांती हिंदवी स्वराज्याची स्थापना पुढे केली. राजांना ती प्रेरणा असती तर त्यांनी याच वेळी हे साधले असते. असो. आदिलशाहीतही राजे २-३ वर्षांपेक्षा जास्त टिकले नाहीत. मलिकंबरच्या मृत्यूनंतर, मूर्तजा निजामशहाने त्यांना परत बोलावून घेतले. पुन्हा निजामशाहीचा मोगलांशीच सामना होता. त्यातही राजांनी पुन्हा पराक्रम केला असता. पण याच सुमारास मूर्तजाने लखुजी जाधवराव, त्याचे पुत्र व नातू यांना वाडयात बोलावून त्या सर्वांचा खून केला. तेव्हा, आपल्यावरही असाच प्रसंग येईल अशी भीती वाटून, राजे मोगलांच्या आश्रयाला गेले. त्यांनी त्यांना पंचहजारी मनसब दिली व त्यांची जहागीर परत दिली. पण वर्षभरातच त्यांना पस्तावा झाला. निजामशाहीचा वजीर फत्तेखान याने मोगलांशी संधान बांधले. ते यशस्वी झाले. तेव्हा राजांची जहागीर काढून मोगलांनी ती फत्तेखानास दिली. त्यामुळे संतापून जाऊन राजांनी मोगलांची ताबेदारी सोडली व ते परत निजामशाहीच्या म्हणजे फत्तेखानाच्या आश्रयास गेले. यापुढे पाच वर्षे शहाजी राजांनी निजामशाही वाचविण्यासाठी खरोखर अद्भुत असा पराक्रम केला. विजापूरचे साह्य जोडून त्यांनी मोगलांशी दीर्घ लढा केला. पुढे विजापूरचे शहा उलटल्यावर दोन्ही सत्तांशी काही काळ लढा केला. निजामशाहीच्या गादीवर कोणीतरी बाहुले बसवून, मुखत्यारीने राज्यकारभार केला. पण निजामशाही वाचली नाही. आदिलशहापुढे राजांना शरणागती पत्करावी लागली. ती पत्करून त्यांनी पुन्हा आदिलशहाचा आश्रय घेतला. जवळ जवळ बारा वर्षे निजामशाही, आदिलशाही व मोगल याशी झुंज दिल्यावरही, शहाजी राजे पुन्हा एका शाहीच्या आश्रयाला गेले.
 बहामनी राज्याची पाच शकले झाली तेव्हाची हकीगत मागे सांगितलीच आहे. पाच स्वतंत्र राज्ये स्थापणारे कोण होते ? दोघे बाटून मुस्लिम झालेले ब्राह्मण. दोघे लहानपणी गुलाम असलेले; एक येथला, एक तुर्कस्थानातून आलेला. यांनी स्वतंत्र शाह्या स्थापन केल्या. बरे, त्या मुस्लिम म्हणून त्यांना निर्वेधपणा मिळाल्या, असे नाही. प्रत्येक शाही बुडविण्याचा इतर शाह्या सतत प्रयत्न करीत. मोगलांच्या स्वाऱ्याही त्याचसाठी होत. तरी त्यांतली एक शाही अठ्ठ्यांयशी वर्षे, दोन दीडशे वर्षे, व बाकी दोन दोनशे वर्षे टिकून होत्या. अशी स्थिती असताना, शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापिले असते, तर तेही दीड-दोनशे वर्षे टिकले असते. इतकेच नव्हे, तर कालांतराने शिवछत्रपतींच्या साह्याने त्यांनी सर्व बहामनी शाह्या बुडवून महाराष्ट्र स्वतंत्र केला असता.