पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२७६
 

जाधवराव, त्यांचे बंधु मंडळ, उदाराम, बाबा काटे, शहाजी भोसले यांचे भाईबंद एकदम निजामशाही सोडून, मोगलांना जाऊन मिळाले आणि मलिकंबरचा त्या वेळी पराभव झाला. पण हेच सरदार संघटित होऊन मराठा राज्य स्थापनेस प्रवृत्त झाले नाहीत. विद्वान ब्राह्मण पंडितांनाच कोणाचा तरी आश्रय लागे असे नाही. या सरदारांनाही आश्रयावाचून जगण्याचे धाडस नव्हते. लखुजी जाधवराव अशाच कारणांनी मोगलांना सोडून पुन्हा निजामशाहीत आले. त्या वेळी मूर्तजा निजामशाहाचा वजीर फत्तेखान हा मगरूर झाला होता. त्याला त्याने लखूजीच्या साह्याने कैद केले. त्याच वेळी मोगल सैन्य निजामशाहीवर चालून येत होते. तरी काही संशय आल्यामुळे मूर्तजाने लखुजी व त्याचा मुलगा अचलोजी यास राजवाडयात बोलावून कपटाने ठार मारले, त्यानंतर लखुजीचा भाऊ जगदेवराव जाधव हा मोगलांकडे गेला. त्यांनी त्याला पंचहजारी मनसब दिली व मग त्याने निजामशाही पूर्ण नष्ट करण्यास मोगलांना साह्य केले. पुढे यांच्या वंशातील अनेक पिढ्यांनी मोगलांची इमानेइतबारे सेवा करून मोठे पराक्रम केले. लखुजी जाधव मारले गेले. त्या वेळी त्यांचा नातू लहान होता. ती शाखा पुढे शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या कारभारात सामील झाली. सेनापती धनाजी जाधव हे त्याच शाखेतले.

भोसले
 बहामनी कालातील मराठा सरदारांत सर्वात पराक्रमी, कर्तबगार व चतुरस्र सरदार म्हणजे शहाजी राजे भोसले हे होत. भोसल्यांचे मूळ पुरुष राजनसिंह व दिलीपसिंह यांनी हसन गंगू जाफरखान यास बहामनी राज्य स्थापन करण्यास साह्य केले आणि त्यांचेच वंशज भीमसिंह यांनी, महंमद गवानच्या हाताखाली पराक्रम करून, कोकणातही बहामनी राज्याची सत्ता पसरविण्यासाठी मोठा पराक्रम केला, हे वर आलेच आहे. भीमसिंहाचे वंशज हेच मुधोळचे घोरपडे यांनी शेवटपर्यंत आदिलशाहीची एकनिष्ठ सेवा केली. भोसल्यांची दुसरी शाखा म्हणजे वेरुळ दौलताबाद या बाजूला वतने मिळवून राहिलेली. मालोजी व शहाजी हे त्याच शाखेतले होत. या शाखेत मालोजीच प्रथम स्वपराक्रमाने उदयास आला. त्याने निजामशाहीत पंचहजारी मनसब व शिवनेरी, चाकण, पुणे व सुपे या मुलखाची जहागीर शहाकडून मिळविली आणि निजामशाहीतील दुसरे प्रसिद्ध सरदार वर सांगितलेले लखूजी जाधवराव यांची मुलगी जिजाऊ हिला सून करून घेऊन, त्या मातबर घराण्याशी सोयरीक जोडून, आपली प्रतिष्ठा खूपच वाढविली. याच मुमारास मोगल पातशहा अकबर याने निजामशाहीवर स्वारी केली व अहमदनगर हे राजधानीचे शहर जिंकले. निजामशाही तेव्हाच बुडायची, पण मलिकंबर हा प्रसिद्ध कर्तबगार वजीर तिच्या पाठीशी उभा राहिला व त्याने परिंडा, दौलताबाद येथे शहाला ठेवून, पुढील वीस पंचवीस वर्षे अकबर, जहांगीर व शहाजहान या तीन मोगल पातशहांशी सामना देऊन ही शाही वाचविली. या सामन्यासाठी