पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७५
मराठा सरदार
 

मुळे सर्वत्र बेदिली माजली होती. त्या वेळी प्रत्येक प्रांतात अराजक माजून ठायी ठायी स्वतंत्र राज्ये निर्माण होत होती. हरिहर आणि बुक्क यांनी याच वेळी विजयनगरला स्वराज्यस्थापना केली. तोच पराक्रम शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव याने करावयास हवा होता. पण तसे काही न करता, त्याने बहामनी राज्य स्थापन करण्याच्या कामी, हसनगंगू यास साह्यच केले. गोविंददेव याने, बहामनी राज्यस्थापना होण्याच्या आधी, खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. पण हसनगंगू येताच ती आकांक्षा सोडून देऊन, अनेक हिंदू राजांबरोबर, त्यानेही त्याला साह्य केले. पुढे बहामनी राजे कृतघ्न होऊन हिंदूंवर जुलूम करू लागले. तेव्हा पश्चात्ताप पावून गोविंददेव याने त्यांच्याविरुद्ध उटावणी केली. पण त्याचा पराभव होऊन त्यास गुजराथेत पळून जावे लागले. पुढे त्याचा मुलगा ठाकुरजी याने बहामनी राज्यात ५० गावांची देशमुखी मिळविली व मलिक उत् तुजार या बहामनी सरदाराच्या हाताखाली अनेक देशमुखांबरोबर पराक्रम करून नाव मिळविले. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्याच्या पाच शाखा झाल्या. त्यांतील निजामशाहीत दिवाण कंवरसेन याच्या हाताखाली, जाधव घराण्यातील एक पुरुष अचलोजी याने ५००० घोड्यांची मनसब मिळविली. १५६५ साली तालिकोटच्या लढाईत रामराजाविरुद्ध निजामशाहीच्या बाजूने विठ्ठलदेव जाधव याने मोठा पराक्रम केला. तो १५७० साली मृत्यू पावल्यावर लक्ष्मणदेव ऊर्फ लखूजी जाधव हे प्रसिद्ध सरदार देशमुखीवर आले. मालोजी भोसले यांचे व्याही ते हेच होत. निजामशाहीत यांनी शौर्याची शर्थ करून अनेक वेळा तिला वाचविले. पण हा सर्व पराक्रम त्यांनी वजीर मलिकंबर याच्या हाताखाली केला. हिंदू व मुसलमान यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने या मलिकंबरचे वृत्त पाहण्याजोगे आहे. हा मूळचा एक गुलाम, तोही बगदादच्या एका व्यापाऱ्याचा. त्याने निजामशाहीचा वजीर चंगीजखान यास विकले. पण या अत्यंत हीन पातळीवरून हा मनुष्य निजामशाहीचा वजीर झाला व आपल्या कर्तृत्वाने त्याने अकबर, जहांगीर, शहाजहान या मोगल पातशहांशी सामना देऊन, रणात त्यांचा पराभव करून, निजामशाही काळाच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढली. लखुजी जाधवराव, मालोजी, शहाजी भोसले, बाबाजी काटे व इतर अनेक मराठा सरदार त्यांच्याच हाताखाली पराक्रम करीत असत !

आश्रय पाहिजे
 मुस्लिम राजसत्तेचे मराठे असे आधार असले तरी, सुलतान किंवा त्यांचे वजीर त्यांचा मुळीच मुलाहिजा राखीत नसत. त्यांना त्यांचा संशय आला, किंवा ते फार पराक्रमी होऊन डोईजड होतील असे वाटले, की ते त्यांची वतने खालसा करीत किंवा त्यांचा नाश करीत. असा प्रसंग दिसू लागताच हे मराठे सरदार एक शाही सोडून दुसऱ्या शाहीच्या आश्रयाला ती सोडून मोगलांच्या आश्रयाला पण कोणाच्या तरी आश्रयाला जात. मोगल सरदार शहानवाजखान निजामशाहीवर चालून आला तेव्हा