पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७७
मराठा सरदार
 

मलिकंबर यास मराठा सरदारांच्या साह्याची फार जरूर होती. त्यामुळे या सरदारांनाही पराक्रमाची संधी मिळाली. मालोजीला शहाजी व शरीफजी हे दोन पुत्र व त्याचा भाऊ विठोजी यास आठ पुत्र होते. मोगल व निजामशाही यांच्या संग्रामात हे सर्वच भासले पुरुष अंगच्या शौर्यधैर्यादी गुणांनी वर आले.
 पण हे सर्व एकजुटीने, एकत्र असा, निजामशाहीत पराक्रम करीत राहिले, असा मात्र याचा अर्थ नाही. एकमेकांविषयीचा मत्सर, वतनांविषयीची भांडणे व खाजगी हेवेदावे यांमुळे जाधव, भोसले व इतर मराठा सरदार यांच्यांत कायमची दुही असे, आणि त्यामुळे एक निजामशाहीत तर दुसरा आदिलशाहीत आणि तिसरा मोगलांच्या पक्षाला अशी या सरदारांची नित्य वा स्थिती असे. मोगल सेनापती शहानवाज खान व मलिकंबर यांची रोशनगावला लढाई झाली त्या वेळी, लखूजी जाधव, विठोजीचे काही पुत्र व इतर अनेक मराठा सरदार मलिकंबरला सोडून मोगलांना मिळाले होते. शहाजीराजे त्या वेळी निशामशाहीच्या बाजूने लढत होते. जाधव आणि भोसले यांचे कायमचे वितुष्ट आले ते येथपासूनच.

शहाजी राजे
 यानंतर आता शहाजी राजे भोसले यांच्या पराक्रमाचा विचार करून मराठी नेतृत्वाचा हा अभ्यास संपवू.
 शहाजी राजांच्या कर्तृत्वाचा इतिहासपंडितांनी फार गौरव केलेला आहे. राजे महापराक्रमी होते. रणधुरंधर होते. अव्वल दर्जाचे मुत्सद्दी होते. त्या काळच्या मराठा सरदारांत आपल्या शौर्यधैर्यादी गुणांमुळे ते अग्रगण्य ठरले होते यात कसलीच शंका नाही. पण इतर मराठा सरदार आणि शहाजी राजे यांच्या कर्तृत्वात काही मूलगामी फरक होता की काय, हे येथे पाहावयाचे आहे. तसा तो फरक होता असे पंडितांचे मत आहे. 'शिवाजीला जर 'राज्यसंस्थापक' असे म्हणावयाचे, तर शहाजीला 'राज्य- संकल्पक' असे पद देण्यास हरकत नाही' असे नानासाहेब सरदेसाई म्हणतात. 'राधा-माधवविलासचंपू' या काव्याच्या प्रस्तावनेत राजवाडे यांनी म्हटले आहे की 'शहाजी राजांनी जवळजवळ स्वतंत्र राज्य स्थापिले होते. शहाजी हा सिंहासनाधीश्वर व छत्रपती नावाने झाला नसला तरी कृतीने तो झाला होता' (पृ. ३२) असा जयराम पिंडे या कवीचा, त्यांच्या मते, अभिप्रेत अर्थ आहे. जयराम कवीने, युधिष्ठिर, विक्रम, शालिवाहन हे शककर्ते शहाजीशी तुलण्याला योग्य नाहीत, असा अभिप्राय दिला आहे. राजवाडे म्हणतात, जयराम कवीची ही उक्ती सार्थ नव्हती, असे कोण म्हणेल?' (पृ. १२१ ) वा. सी. बेंद्रे यांनी तर शिवछत्रपतीचे कर्तृत्व हे मूलतः शहाजी राजांचेच होते, असे म्हटले आहे. 'हिंदवी स्वराज्या' च्या हालचालींना त्यांनी सुरुवात करविली. शिवाजीकडून मावळी जमाव जमवून, हिंदवी स्वराज्याचा मुहूर्त केला, अशी भाषा ते वापरतात. (मालोजीराजे आणि शहाजी महाराज, पृ. ५७४ )