पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२६०
 

 आजपर्यंत या इतिहासांचा मुख्य आधार म्हणजे फिरिस्ता या इराणी लेखकाचा 'हिस्टरी ऑफ दि राइज ऑफ दि मोहमेडन पॉवर इन इंडिया' हा ग्रंथ होय. हा मूळचा कास्पियन समुद्राजवळ राहणारा. बहामनी काळात, अनेक परदेशी मुस्लिम भारतात येत, तसा हा आला होता व नगर, विजापूर येथील सुलतानांच्या आश्रयाला राहिला होता. तेथे राहून अनेक ग्रंथ मिळवून याने १६१२च्या सुमारास वरील ग्रंथ पुरा केला. त्याची इंग्रजीत दोनतीन भाषांतरे झालेली आहेत. अलीकडच्या संशोधना- अन्वये पाहता फिरिस्ताच्या इतिहासात अतिशयोक्ती, सत्यविपर्यास, काल्पनिक माहिती, संशयास्पद विधाने असे फार दोष आहेत. विद्याभवनाने प्रकाशित केलेल्या इतिहासात बहामनी व विजयनगर या राज्यांचे इतिहास अनुक्रमे डॉ. जोशी व डॉ. वेंकटरमणय्या यांनी लिहिले असून फिरिस्ताचे वरील दोष त्यांनी ठायी ठायी दाखवून दिले आहेत. आणि आद्ययावत् साधनांच्या आधारे आपले इतिहास लिहिले आहेत.

तुंगभद्रा ते कृष्णा
 बहामनी सत्तेचे विजयनगरच्या साम्राज्याशी संग्राम मुरू झाले ते पहिला सुलतान हसन गंगू याचा मुलगा महंमदशहा पहिला याच्या वेळी (१३५८ - १३७५). त्या वेळी विजयनगरच्या गादीवर सम्राट बुक्क हा होता. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांतील दुआब व तेथील रायचूर व मुद्गल हे किल्ले यांवरील सत्तेविषयीचा वाद हा बहुधा या दोन सत्तांमध्ये झालेल्या युद्धाच्या मुळाशी होता. हसन गंगू याने हे किल्ले घेतले होते. सम्राट बुक्क व वरंगळचा राजा यांनी महंमदशहाला अंतिमोत्तर पाठवून या किल्ल्यांची मागणी केली. याच पत्रात वरंगळच्या राजाने कौलस या आपल्या किल्ल्याची मागणी केली. महंमदाने या मागण्या नाकारल्यामुळे युद्धाला तोंड लागले. या युद्धातील सर्व मोहिमांत महंमदशहाला विजय मिळाले असे फिरिस्ता लिहितो. पण तहाच्या अटी पाहिल्या तर ते सर्वस्वी खोटे आहे असे दिसते. आपल्या साम्राज्याची हद्द कृष्णे- पर्यंत असावी, दुआबावर आपली सत्ता असावी, अशी बुक्काची मागणी होती. तहात ती महंमदशहाने मान्य केलेली आहे. तेव्हा लढाईत विजयनगरचा विजय झाला हे उघडच आहे. ही लढाई १३६५ साली झाली. महंमदाच्या मागून त्याचा मुलगा मुजाहिद (१३७५ - ७८) सुलतान झाला. त्याने तख्तावर येताच १३६५ सालचा तह रद्द समजून तुंगभद्रा ही बहामनी राज्याची दक्षिण सरहद्द मानावी अशी मागणी केली; व सम्राट हरिहर २ रा याने ती नाकारताच दुआबावर हल्ला केला. पण अडोनी येथे हरिहराच्या सैन्याने त्याचा पूर्ण पराभव केला. तेथून परत येत असताना मुजाहिदचा खून झाला. त्यामुळे बहामनी राज्यात सर्वत्र गोंधळ माजला. ही संधी साधून हरिहराने उत्तर कर्नाटक, वनवासीप्रांत, गोवा व कोकण, यांवर स्वारी करून तो सर्व प्रदेश जिंकला. गोवा, चौल, दाभोळ ही बंदरे तुरुष्कांचा पराभव करून हरिहराचा सेनापती माधवमंत्री याने जिंकली, असे इतिहासकार सीवेल याने म्हटले आहे (फर-