पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६१
बहामनी काल
 

गॉटन एंपायर, पृ. ३०१ ) सुलतान फिरोजशहा (१३९७ - १४२२) याने १३९८, १४०६ व १४१७ या सालीं विजयनगरवर तीन वेळा स्वाऱ्या केल्या. राचकोंडाचे बेल्मा व कोडविडूचे रेड्डी हे हिंदुराजे होते. पण ते नेहमी बहामनी सुलतानाशी सख्य ठेवून असत. विजयनगरच्या सत्तेशी त्यांनी कायम वैर धरले होते. १३९७ साली महंमदशहा २ रा हा मृत्यू पावला व त्याचा सतरा वर्षांचा मुलगा ग्यासुद्दिन हा गादीवर आला. पण तुघलचिन या एका प्रबळ सरदाराशी त्याचे वाकडे होते. यामुळे संधी साधून तुघलचिन याने ग्यासुद्दिनचे डोळे काढले व दरबारातील अनेक सरदारांचे खून केले. या घालमेलीत ग्यासुद्दिनचा मेहुणा फिरोज याने तख्त बळकावले. या अंदाधुंदीची संधी साधून सम्राट हरिहर २ रा याने बहामनी प्रदेशावर हल्ला करून सागर हा किल्ला घेतला. या वेळी झालेल्या लढाईत वेल्मा हे सुलतानाच्या पक्षाला होते. नळगोंडा जिल्ह्यातील पानगळ येथील शिलालेखाप्रमाणे हरिहराने दोघांचाही पराभव करून कृष्णेचा उत्तरेचाही काही मुलूख घेतला. १४०६ साली देवराय १ ला विजयनगरच्या गादीवर आला. याच साली सुलतान फिरोज याने दुआबावर स्वारी केली व त्याचे दोस्त बेल्मा व रेड्डी यांनी विजयनगर साम्राज्याच्या पूर्व प्रदेशावर हल्ला चढविला. फिरिस्ताच्या वृत्तांताप्रमाणे सुलतान थेट विजयनगरच्या वेशीपर्यंत गेला व त्याने सर्व प्रांत उजाड करून टाकला. तेव्हा देवरायाने मोठी खंडणी व राजकन्या देऊन त्याला परत पाठविले. इतर मुस्लिम इतिहासकार राजकन्येचा उल्लेखही करीत नाहीत. त्यांच्या मते सुलतात विजयनगरपर्यंत पोचलाही नव्हता. देवराय हा मोठा पराक्रमी असून त्याने आपल्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याच्या कक्षा वाढविल्या, हे सर्वमान्य आहे. अशा स्थितीत देवरायाने वरील नामुष्कीच्या तहास मान्यता दिली असेल हे सर्वथा असंभवनीय आहे. १४१७ च्या लढाईत तर सुलतान फिरोज याचा नक्षाच उतरला. पानगळचा किल्ला अत्यंत बळकट असून तो मोक्याच्या ठिकाणी होता. हे त्याचे महत्त्व जाणून फिरोजने त्यास वेढा घातला. हा वेढा दोन वर्षे चालू होता. किल्ल्यातील शिबंदी मोठ्या धैर्याने लढत होती. शेवटी देवरायाने अनेक हिंदू राजे मिळवून घेऊन वेढा घालणाऱ्या फौजेला घेरा घातला. याच वेळी किल्ल्यावरील सेनाही खाली उतरली व अशा रीतीने दोन चक्रांत गाठून त्यांनी बहामनी सैन्याचा निःपात केला व देवरायाने दुआबावर आपले स्वामित्व निर्विवाद प्रस्थापित केले. देवराय २ रा (१४२२ - ४६) याच्या कारकीर्दीत बहामनी सुलतानांनी विजयनगरवर तीन वेळा स्वारी केली. पण तीनही वेळा कृष्णा तुंगभद्रा दुआब हा विजयनगर- कडेच राहिला असे दिसून येते. १४७० साली महंमदशहा ३ रा याचा वजीर महंमद गवान याने कोकणावर स्वारी केली. आणि दोन तीन वर्षांत सर्व कोकण व गोवा प्रांतही त्याने घेतला. गोवा व कोकण गेल्यामुळे विजयनगरचे फार मोठे नुकसान झाले. त्या साम्राज्याच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसला. त्या वेळचा सम्राट विरुपाक्ष याने गोवा परत घेण्याचे दोन तीनदा प्रयत्न केले. पण ते निष्कळ झाले. पुढे काही