पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५९
बहामनी काल
 

हुमायून हा प्रजाजनांच्या स्त्रिया व मुली जबरीने पळवून आणीत असे. तो मेला तेव्हा त्याच्या सरदारांनीही निःश्वास टाकला. बहुतेक सर्व सुलतानांची मद्यासक्ती, भोग लालसा, पिसाट धर्मांधता, परधर्माविषयीची इस्लामी धर्माची शत्रुवृत्ती हे सर्व घटक ध्यानात घेता बहामनी राज्यात हिंदुधर्मीयांची स्थिती काही निराळी असणे शक्यच नव्हते हे सहज ध्यानी येईल.

विजयनगर व बहामनी
 गुलबर्गा येथे १३४७ साली बहामनी राज्य स्थापन झाले. त्याच्या आधी अकरा वर्षे म्हणजे १३३६ सालीच विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना झाली होती. आणि ती, मुस्लिम आक्रमणापासून हिंदुधर्माच्या रक्षणाच्या उद्देशानेच झाली होती. मलिक काफूर याने इ. स. १३१९ सालापर्यंत दक्षिणेतील सर्व हिंदुराज्ये उद्ध्वस्त करून टाकलीच होती. त्यानंतर महंमद तल्लख याने त्या सर्व प्रदेशावर मुस्लिम सत्ता प्रस्थापित करून दौलताबाद, मदुरा येथे आपले सुभेदार नेमले होते. या मुस्लिम आक्रमणाचा उच्छेद करण्यास भारतात दोनच सत्ता समर्थ झाल्या. त्या म्हणजे मेवाडची रजपूत सत्ता व विजयनगरची कन्नड सत्ता. १३३६ साली विजयनगर येथे संगम वंशातील हरिहर व बुक्क यांनी स्वतंत्र हिंदुराज्याची स्थापना केल्यानंतर हळूहळू त्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेचा सर्व प्रदेश मुस्लिमांपासून मुक्त केला व त्याच वेळी तुंगभद्रेच्या उत्तरेस पाऊल टाकून कृष्णेपर्यंत हिंदुराज्याची सीमा भिडविण्याचा त्यांनी निश्चय केला. यातूनच बहामनी राज्याशी त्यांचा संघर्ष उद्भवला. बहामनी राज्याच्या इतिहासात प्रारंभापासून अखेरपर्यंत विजयनगरच्या राज्याशी झालेल्या लढाया हे एक कायमचे प्रकरण आहे. किंबहुना बहामनी इतिहास तीनचतुर्थांश तरी या संग्रामांच्या वृत्तानेच व्यापला आहे, असेही म्हणण्यास हरकत नाही.

इतिहासलेखन नाही
 या संग्रामांचे इतिहास मुस्लिम इतिहासकार व काही पाश्चात्य इतिहासकार यांनी लिहून ठेविले आहेत. हिंदू पंडित हे अनादी कालापासून इतिहासाविषयी उदासीन असल्यामुळे आजपर्यंत दुर्दैवाने भारताच्या इतिहासाच्या अभ्यासकाला त्या परकी इतिहासकारांवरच अवलंबून राहावे लागत असे. अलीकडेच नाणी, शिलालेख, वाङ्मय इ. साधनांच्या साहाय्याने हिंदू पंडितांनी भारताच्या इतिहासाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यांतील डॉ. कन्हय्यालाल मुन्शी यांनी भारतीय विद्याभवनातर्फे केलेला प्रयत्न सर्वात मोठा व तितकाच अभिनंदनीय आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल' या नावाने दहा खंडांत त्यांनी हा इतिहास प्रसिद्ध केला आहे. त्यांतील सहाव्या खंडातील बहामनी व विजयनगर यांच्या इतिहासांच्या आधारे पुढील विवेचन केले आहे.