पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२५८
 

प्रजेविषयी अन्नाच्या बाबतीत असा दारुण पक्षपात होता. मग एकंदर बहामनी राज्यात काय असेल ते कळतेच आहे.
 धर्माच्या दृष्टीने पाहता, हिंदू हे इस्लामच्या मूळ सिद्धान्ताप्रमाणेच मुस्लिमांचे शत्रु होते. शिया व सुनी हे इस्लामचेच दोन पंथ. त्यांच्यांत किती सलोखा व सहिष्णुता होती ते वर सांगितलेच आहे. स्वधर्मातल्याच एका पंथाची दुसरा जेथे घोर कत्तल करण्यात भूषण मानीत असे, तेथे सर्वस्वी परधर्मी व निर्बल असे जे हिंदू त्यांच्या नशिबी काय असेल, हे सांगण्याचे कारण नाही. सय्यद अली तवा तवा हा सोळाव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला मुस्लिम इतिहासकार. त्याने 'बुरहाने मासीर' या नावाचा बहामनी राज्याचा इतिहास लिहिला आहे. त्यावरून हिंदुप्रजेविषयी बहामनी सुलतानांची काय वृत्ती होती ते स्पष्ट दिसून येते. त्याचे पहिलेच वाक्य असे आहे, सुलतान अल्लाउद्दिन हसनशहा गंगू बहामनी याने दक्षिणेत इस्लामची स्थापना करून काफरांचा उच्छेद केला.' अन्यत्र तो म्हणतो, 'वरील सरदारांपैकी इमाद उलमुल्क आणि मुबारकखान यांनी सुलतानाच्या आज्ञेप्रमाणे हिंदूंच्या मुलखात लुटालूट करीत तापी नदीपर्यंत मजल मारली. वाटेत त्यांना जे जे मूर्तिपूजक आढळले त्यांची त्यांनी सर्रास कत्तल केली.' हसन गंगू हा कोणी शेख जुनैदी याचा चाकर होता. त्या वेळी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असे सांगताना शेख म्हणाला,' हसन राजा, तू सैन्य गोळा कर आणि जिहाद पुकारून पाखंड्यांचा सर्व प्रदेश इस्लामच्या छायेखाली आण.' (बहामनी राज्याचा इतिहास, सय्यद अली याच्या 'बुरहाने मासीर' या पुस्तकाचे भाषांतर, भाषांतरकार डॉ. भ. ग. कुंटे, पृ. २, ७, २६,) या पुस्तकाला जोडलेल्या प्रस्तावनेत डॉ. कुंटे यांनी बहामनी राज्याबद्दल मधून मधून पुढीलप्रमाणे अभिप्राय दिले आहेत. 'शिया व सुनी हे वाद ज्यांच्यांत प्रबळ होऊन घोर कत्तली होऊ शकतात ते राज्यकर्ते आपल्या सामान्य बहुसंख्य हिंदुप्रजेबरोबर सहिष्णुतेने वागणे असंभवनीय होते.' 'हिंदु-समाजाला सांस्कृतिक दृष्टीने नेस्तनाबूद करणे जरी बहामनी राज्यकर्त्यांना शक्य झाले नाही, तरी इतर सर्व बाबतीत मात्र त्यांनी हिंदूंची गळचेपी करण्यास मागेपुढे पाहिले नाही.' आपल्या अहमदनगरच्या इतिहातात, सय्यद अली, 'काफरांची देवळे पाडण्यात आली, त्यांची मालमत्ता जत करण्यात आली' असे स्पष्टपणे म्हणतो. तीच स्थिती बहामनी राज्यात असली पाहिजे, हे नाकारणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे होय.' बहामनींची सारी कारकीर्द वारसाहक्कासाठी झालेली बंडे व खून यांनी भरलेली आपल्याला दिसून येईल.' महमूद गवान याचा कालखंड सोडून दिल्यास बहामनींना राजकीय स्वास्थ्य व शांतता यांचा लाभ कधीच झाला नाही.' (उक्त ग्रंथ ). सुलतान हुमायून, सुलतान महमूदशहा (१४८२ ते १५१८) हे तर केवळ सैतानच होते. प्रजेची कत्तल करणे हा त्यांचा करमणुकीचा प्रकार होता. अल्लाउद्दिन, महंमद २ रा यांसारखे आरंभी बरे असलेले सुलतानही पुढे व्यसनासक्त झाल्यावर या प्रकाराने मनोरंजन करून घेत.