पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२५२
 

बांधून त्याला शरण गेला आणि अपार खंडणी देऊन त्याने त्याला परत पाठविले.
 महंमद तल्लखाची सत्ता काही काळ, निदान पाच-सहा वर्षे तरी, अखिल भारतावर पसरली होती. पण तिला स्थैर्य असे कधीच आले नाही. प्रत्येक प्रांतात बंडाळ्या चालु होत्या. बंगाल, गुजराथ, माळवा, महाराष्ट्र येथले सुभेदार सारखे स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत होते. आणि महंमद त्यांच्यावर सारख्या स्वाऱ्या करीत होता व सापडतील त्या सरदारांच्या कत्तली करीत होता. १३४५ साली गुजराथमध्ये बंडाळी झाली, म्हणून महंमद तेथे चालून गेला, तो इकडे देवगिरीला उठावणी झाली. कुतलबखान नावाचा सरदार तेथे सुभेदार होता. त्याला महंमदाने कारण नसता बडतर्फ केले. त्यामुळे सर्व सरदार चिडून गेले होते. त्यांनीच ही उठावणी केली होती. हे ऐकताच गुजराथमधून महंमद देवगिरीवर धावून आला. पण गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली म्हणून त्याला परत जावे लागले. याच वेळी हसन गंगू बहामनी हा सरदार उद्यास आला व त्याने गुलबर्गा येथे १३४७ साली स्वतंत्र राज्य स्थापन केले. सुलतान महंमद याने गुजराथेतील बंडाळ्या मोडल्या व तेथून तो सिंधवर निघाला. पण वाटेतच १३५१ साली तो मृत्यू पावला. त्यामुळे गुलबर्गा येथे नव्याने स्थापन झालेल्या बहामनी राज्याला निर्वेधता मिळाली.

सामर्थ्यच नाही
 प्रत्येक प्रांतात होणाऱ्या बंडाळ्या, दर वेळी वारशासाठी होणाऱ्या कत्तली, राज्यातील सरदारांमधील नित्याची दुही, सुलतानांच्या पिसाट लहरीमुळे होणारा अनन्वित जुलूम, प्रजेचा रक्तशोष, तिची अन्नान्नदशा, प्रत्येक स्वारीत होणारी अमित प्राणहानी आणि शेती व व्यापार यांचा होणारा विध्वंस, सुलतानांची नादानी, यामुळे सर्वत्र कायम असणारी अंदाधुंदी यामुळे दिल्लीची मुस्लिम पातशाही किती अस्थिर, बलहीन व भंगुर होती हे सहज ध्यानात येईल. तरीही, अशाही स्थितीत, हिंदूंना ती नष्ट करून तेथे हिंदू साम्राज्याची स्थापना करता आली नाही. मुस्लिम सरदारांपैकी कोणीही उठून सुलतानाला ठार मारून तख्त बळकावू शकत असे. तेव्हा सुलतानी सत्तेच्या ठायी किती सामर्थ्य होते ते दिसतेच आहे. पण असल्या विकल, भंगुर नित्य डळमळीत असणाऱ्या सत्तेचा हिंदूंना नाश करता आला नाही, ११९३ साली हातातून गेलेली दिल्ली परत घेता आली नाही. या समाजाच्या ठायी ते सामर्थ्यच राहिले नव्हते. निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अपरिवर्तनीयता, सिंधुबंदी, स्पर्शबंदी या अधर्मालाच धर्म मानल्यामुळे हा समाज विघटित झाला होता, त्याचे बुद्धिसामर्थ्य लोपले होते, विपरीत धर्माच्या रोगामुळे तो आतून पोखरून निघाला होता.
 दिल्लीच्या केंद्रसत्तेकडून प्रांताकडे पाहिले तरी हेच दिसून येते. बंगाल, गुजराथ, पंजाब, माळवा, महाराष्ट्र, मदुरा या प्रांतांत स्वतंत्र सत्ता स्थापन झाल्या. पण त्या हिंदूंच्या नव्हे, तर मुस्लिमांच्या ! दिल्लीच्या सत्तेचे जोखड झुगारून देण्याचे सामर्थ्य