पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५१
बहामनी काल
 

आक्रमकांचे निर्दाळण, शत्रूंवर विजय नव्हे विजयमालिका, हा तेव्हाचा नियम होता. आता पराभव हा नियम झाला ! यादवांचा एक, दोन, तीन, चार लढायांत लागोपाठ पराभव होऊन त्यांचे साम्राज्य नष्ट झाले. गौतमीपुत्र शातकर्णी, सत्याश्रय पुलकेशी, राष्ट्रकूट गोविंदराज यांच्या काळी मराठ्यांच्या ठायी असलेला पराक्रम आता कोठे गेला ?

दिल्लीचे बलाबल
 १३१८ साली यादवांचे राज्य खालसा झाले, त्यानंतर १३४७ मध्ये हसन गंगू- जाफर खान याच्या बहामनी राज्याची स्थापना होईपर्यंत तीस वर्षांच्या काळातही दिल्लीची सुलतानी बलाढ्य होती असे नाही. बंडाळ्या, खून, कत्तली मागील अंकावरून पुढे चालू होत्या. १३२० साली मुबारक खिलजी याचा त्याचा सेनापती मलिक खुश्रू तथा खुश्रुखान याने खून केला, अल्लाउद्दिनाच्या राहिलेल्या मुलांपैकी तिघांचे डोळे काढले, दोघांना ठार मारले आणि तो स्वतः सुलतानपदी आरूढ झाला. आपली सत्ता निर्वेध करण्यासाठी त्याला अनेक सरदारांची व त्यांच्या अनुयायांची कत्तल करणे भाग होते. हा खुश्रुखान मलिक काफूरप्रमाणेच मूळचा हिंदू होता. असा एक प्रवाद आहे की सुलतान झाल्यावर त्याने हिंदुसत्ता दिल्लीस प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. पुष्कळांना हे मान्य नाही. पण त्याच्या विरुद्ध ग्यासुद्दिन तघ्लख याने उठावणी केली ती 'इस्लाम धर्मावर संकट आले' अशी घोषणा देऊनच केली हे सर्वमान्य आहे. (दिल्ली सलतनत, भारतीय विद्याभवन, खंड सहावा, पृ. ४४-४६ ) लढाईत खुश्रुखान मारला गेला व ग्यासुद्दिन तल्लख सुलतान झाला. त्या पदी येताच त्याने आपला मुलगा जौनाखान - महंमद तल्लख - यास दक्षिणेतील बंडाळ्या मोडण्यासाठी पाठविले व तो बंगालमधील बंडाळ्या मोडण्यासाठी चालून गेला. १३२५ साली जौनाखान याने बापाचा खून केला आणि महंमद तघ्लख म्हणून तो तख्तावर आला. त्याची कारकीर्द १३५१ पर्यंत टिकली; पण बंडाळ्या, उठावण्या, कत्तली, रक्ताच्या नद्या, प्रजेची अन्नान्न दशा, अनन्वित छळ असह्य जुलूम हेच तिचे प्रधान लक्षण होते. याने आपली राजधानीच देवगिरीस आणली होती. असे करण्यामुळे दिल्ली ओस पडली, प्रवासात हजारो लोक मरण पावले व अनेक सरदार घराणी नामशेष होऊन राज्याला मोठा हादरा बसला. तांब्याची नाणी त्याने प्रचलित केल्यामुळे तर भूकंप झाल्याप्रमाणे सर्वत्र प्रलय झाला. या दोन्ही प्रसंगी विरोधी पक्षाच्या लोकांच्या कत्तली तो करीतच होता. अनेक मुस्लिम उलेमा, मौलवी त्याच्या विरुद्ध होते. त्यांनाही त्याने ठार मारले. या काळात मध्य आशियातील मोगल लोकांच्या दिल्लीवर स्वाऱ्या येतच होत्या. या स्वाऱ्या म्हणजे अस्मानी संकटच असे. १३२७ साली चकताई सरदार तरमाशिरीन हा लाखाच्या फौजेसह हिंदुस्थानावर कोसळला. आणि सिंध, मुलतान, दिल्ली हे प्रांत त्याने कत्तली, आग, लूट यांनी उजाड करून टाकले. महंमद हात