पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५३
बहामनी काल
 

भिन्न भिन्न प्रांतातील मुस्लिम सरदारांच्या ठायी होते. पण तेथे शतकानुशतके राज्य करणाऱ्या हिंदू सरदारांच्या ठायी ते नव्हते. या काळात त्या त्या प्रातांतील मुस्लिम सत्ता उलथून हिंदुराज्य स्थापन करण्याचे सामर्थ्य फक्त दोनच प्रांतांनी प्रगट केले. ते म्हणजे मेवाड व विजयनगर. त्यांचा विचार पुढे योग्य संदर्भात येईलच. प्रथम आता दिल्लीच्या सत्तेला उपमर्दून महाराष्ट्रात स्थापन झालेल्या बहामनी सत्तेचे स्वरूपवर्णन करू.

हिंदूंच्या नादानीचा इतिहास
 या सत्तेचे स्वरूप दिल्लीच्या सुलतानी सत्तेहून फारसे निराळे नव्हते. राजसत्ता दुबळी, कमजोर व अकार्यक्षम होण्यास जी जी कारणे असू शकतात ती सर्व येथे होती. म्हणूनच हा इतिहास म्हणजे मुस्लिमांच्या कर्तबगारीचा पराक्रमाचा, सामर्थ्याचा इतिहास नसून हिंदूंच्या नादानीचा, कर्तृत्वशून्यतेचा, दैन्यदारिद्र्याचा इतिहास आहे, हे निर्विवाद सिद्ध होते. हिंदू राजवंशांच्या कर्तबगारीच्या दृष्टीने पाहता प्रारंभीच एक विपरीत गोष्ट दिसून येते. इ. स. १३३४ साली राजस्थानातील शिसोदे कुलातील सजनसिंह व क्षेत्रसिंह हे दोन तरुण पुरुष दक्षिणेत आले होते. हसन गंगू तथा जाफरखान हा त्यानंतर लवकरच उदयास आला. हा जाफरखान व ते दोघे रजपूत यांच्या पराक्रमाची तुलना करता काय दिसते ? जाफरखान हा मूळचा गुलाम. त्याच्या पाठीशी कसलीही पूर्वपरंपरा नाही. असे असून दक्षिणेत येऊन त्याने स्वतंत्र राज्य स्थापिले आणि सजनसिंह व त्याचा पुत्र दिलीपसिंह हे भारतातल्या अत्यंत विख्यात अशा शिसोदे रजपूत कुलातील राजपुत्र. त्यांनी काय मिळविले ? दक्षिणेत राज्य स्थापन करण्यात त्यांनी जाफरखानाला साह्य केले व त्याला प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून दौलताबादेजवळ दहा गावांची जहागिरी व सरदारी मिळविली ! ( मराठी रियासत - शहाजी, सरदेसाई, पृ. १८ )
 दुसरी अशीच व इतकीच विपरीत आणि उद्वेगजनक गोष्ट या इतिहासाच्या प्रारंभी दिसून येते. यादव राजांनी दिल्लीचे मांडलिकत्व सुखाने पत्करिले असे नाही. ते जू झुगारून देण्याचा त्यांनी सारखा प्रयत्न चालविला होता, हे वर सांगितलेच आहे. रामदेवराव, शंकरदेव व हारपाळदेव यांपैकी प्रत्येकाने स्वतंत्र होण्याची धडपड चालविली होती. पण त्यांना अल्पांशानेही यश आले नाही. उलट जाफरखानाने मात्र गुलबर्ग्याला राज्य स्थापन केले व दिल्लीचे जोखड झुगारून देण्याचे मनात येताच, एखादे झुरळ उडवून द्यावे तसे त्याने ते उडवून लावले. वर सांगितलेच आहे की प्रत्येक प्रांताच्या मुस्लिम सुभेदाराने याप्रमाणेच दिल्लीला झुगारून दिले. पण बहुसंख्य हिंदू राजवंशांना- राम, कृष्ण, चंद्र, सूर्य यांच्यापर्यंत परंपरा नेऊन भिडविणाऱ्या राजवंशांना ते शक्य झाले नाही !