पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२५०
 


कीड लागली
 पुन्हा ही एका राज्याच्या नालायकीची, नादानीची कथा नाही, रामदेवराव हाच नाकर्ता होता असे नाही. तसे असते तर पहिले दोन पराभव त्याच्या माथी मारता आले असते. पण पुढेही तेच झाले. त्याच्या मृत्यूनंतर शंकरदेव राजा झाला. त्यालाही मुस्लिमांचा प्रतिकार करता आला नाही. तो स्वतःच मारला गेला. नंतर हरपाळदेव आला. त्याचे कर्तृत्वही त्याच लायकीचे. या वेळी तर अल्लाउद्दिन व काफूर दोघेही मृत्यू पावले होते. मुबारक खिलजी हा सुलतान अत्यंत नादान, दारुडा, बदफैली व व्यसनमग्न असा होता. पण खंडणी थांबवताच चालून यावे, ही रग त्याच्या ठायी आहे, आणि लष्कर, सेनापती, सरदार यांचे संयोजन करून देवगिरीचा पाडाव करावा ही कर्तबगारीही त्याच्या ठायी आहे ! तेव्हा हिंदूंच्या सामर्थ्याला जीवन- शक्तीला, कर्तबगारीला कसली तरी कीड लागली होती, हा समाज आतून पोखरून गेला होता, जगण्याची विद्या त्याच्या बुद्धीतून नष्ट झाली होती, असाच यातून निष्कर्ष निघतो. अन्यथा देवगिरीचे यादव आणि दक्षिणेतील इतर सर्व हिंदुराज्ये दहा पंधरा वर्षात भूतलावरून नाहीशी व्हावी या भयानक घटनेचे स्पष्टीकरण करता येत नाही.

तेव्हा आणि आता
 या वेळी हिंदुसमाजाचा संपूर्ण शक्तिपात झाला होता, त्याची जीवनशक्तीच नष्ट झाली होती, हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येईल. त्या वेळी दिल्लीच्या पातशाही सत्तेचे स्वरूप काय होते ? ती किती समर्थ होती ? मुस्लिम व वरिष्ठ सरदार वर्गात ऐक्य, संघटना कितपत होती ? सुलतानावर अनन्यनिष्ठा ठेवणारे लोक किती होते ? इतिहास पाहता या सर्व प्रश्नांचे उत्तर 'शून्य' असे आहे. राजधानीत नित्य बंडाळ्या चालत. अल्लाउद्दिनाने चुलत्याचा खून करून तख्त बळकावले व त्याच्या पक्षाच्या अनेक सरदारांना ठार मारले. हिंदूंवर असह्य कर लादून त्याने त्यांचा अनन्वित छळ चालविला होता. शेवटी मलिक काफूरने त्यालाच कैदेत ठेवून, केवळ संशयावरून अनेक लोकांना ठार मारले, सुलतानाच्या दोन मुलांचे डोळे काढले, बेगमेला कैदेत घातले आणि तो मरताच स्वतः तख्त बळकाविण्याचा घाट घातला. पण मुबारक खिलजीच्या पक्षाच्या लोकांनी त्याला ठार मारून मुबारकला तख्तावर बसविले. असे प्रकार चालू असताना सत्तेला दृढता कितीशी येणार ? राज्य बलाढ्य कसे होणार ? ते केव्हाही शक्य नव्हते. तरीही यादवांना आपले हरपलेले स्वातंत्र्य परत मिळविता आले नाही. या अधःपाताला काही सीमा आहे काय ? पाचव्या सहाव्या शतकात रानटी हूण जमातींनी सर्व युरोपचे निर्दाळण केले होते. रोमन साम्राज्य धुळीला मिळविले होते. त्या हूणांना गुप्त सम्राटांनी अनेक वेळा खडे चारले. पुढे अर्धशतकानंतर त्यांनी फिरून उठावणी करताच यशोवर्म्याने त्यांचा निःपात केला.