पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४१
साहित्य, कला व विद्या
 

गोविंद ४ था याच्या काळातील हे दानपत्र आहे. विजापूर जिल्ह्यातील सालोटगी हे गाव असेच अग्रहार होते. राजा कृष्ण (३ रा) याच्या काळी येथे संस्कृत विद्यालय होते. या राजाचा एक मंत्री नारायण याने सालोटगी येथे 'त्रयी पुरुष' हे मंदिर बांधले होते. त्या मंदिरात हे विद्यालय चालत असे. फार लांबून लांबून येथे विद्यार्थी येत आणि त्यांच्यासाठी सत्तावीस वसतिगृहे बांधलेली होती. १२ निवर्तने (अदमासे ६० एकर) जमिनीचे एक दान विद्यालयाला मिळाले होते. त्यातून येथील दिवाबत्तीचा खर्च भागत असे. ५० निवर्तनांचे दुसरे एक दान दिलेले होते. त्यातून आचार्यांचा योगक्षेम चाले. गावातील लोक लग्नमुंजीच्या प्रसंगी विद्यालयाला दाने देत. विद्यालयाची इमारत एकदा कोसळून पडली. ती गावातील एका सामंताने पुन्हा बांधून दिली, असे एका लेखात सांगितले आहे.
 या काळातील लेखांवरून असे दिसते की शंभर दोनशे गावे सहज अग्रहार होती. आणि ती बहुतेक गावकऱ्यांनी खाजगी देणग्यांतून चालविली होती. डंबळ येथील व्यापारी संघ श्रीमंत असून एकंदर अठरा गावे त्याच्या कक्षेत होती. या संघाने डंबळ येथे एक विद्यालय चालविले होते. यावरून राजे, सामंत, धनिक, गावकरी, यांच्याप्रमाणेच व्यापारी संघही शिक्षण ही आपली जबाबदारी आहे, असे मानीत असत असे दिसते.

यादव काळ
 राष्ट्रकूटांप्रमाणे यादवांच्या राज्यातही मालखेड, कल्याणी, देवगिरी, नाशिक, पैठण, पाटण, कऱ्हाड, ठाणे, बीड, वाघळी अशा गावी पाठशाळा व शिक्षणाची केंद्रे असत. तेथे विद्याभ्यास त्याच पद्धतीने चाले. रामदेवरावाने आपल्या कुलगुरूच्या आज्ञा प्रमाण मानून विधिवास (नेवासे) खंपणकातील बिल्वग्राम, पिप्पलग्राम, आणि त्यांच्यामधला सर्व भूभाग ब्राह्मणांना अग्रहार करून दिला होता. शिवाय वेळोवेळी त्याने 'नवी अग्रहारे ब्राह्मणांसी नविया वृत्ती दिधलिया.' वेजाई नावाच्या एका यादव राणीने वैजनाथाचे देवालय बांधून ब्राह्मणांना तेथे वृत्ती दिल्या होत्या. खानदेशात वाघळीच्या विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांचे विद्याव्याख्यानकारिन् आणि पुण्यव्याख्यानकारिन् असे दोन वर्ग केलेले होते. पहिले ऐहिक विषय शिकविणारे व दुसरे पारमार्थिक विद्या शिकविणारे. यांपैकी प्रत्येकाला सोळा निवर्तने जमीन दान दिलेली होती.
 सुप्रसिद्ध ज्योतिर्विद भास्कराचार्य यांचा नातू आणि सिंघण यादवाचा राजदैवज्ञ चांगदेव याने चाळीसगावाजवळ पाटण येथे ज्योतिषशास्त्राच्या अध्यापनासाठी एक मठ स्थापून शाळा चालविली होती. भास्कराचार्यांच्या सर्व ग्रंथांचे तेथे सखोल अध्ययन होत असे.
 याप्रमाणे मठ, पाठशाळा, व अग्रहार अशा संस्थांतून विद्येचे अध्ययन महाराष्ट्रात १६