पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२४२
 

होत असे. आरंभी सांगितल्याप्रमाणे वरील वर्णने राष्ट्रकूट व यादव यांच्या काळची आहेत. पण सातवाहन, वाकाटक, चालुक्य यांच्या काळीही याच पद्धतीने शिक्षण चालत असे, असे अनुमान करण्यास हरकत नाही.

ऐहिक विद्या ?
 यावरून एक गोष्ट दिसते की त्या काळी शिक्षणसंस्था म्हणून ज्या स्थापिल्या होत्या तेथे बव्हंशी संस्कृतविद्येचे अध्ययन होत असे. मग ऐहिक विषयांच्या शिक्षणाचे काय ? या काळात महाराष्ट्रात किती प्रकारचे उद्योग चालत असत ते मागे सांगितलेच आहे. सोने, रूपे, तांबे यांच्या खाणी व यांचे जिन्नस, नौकाबांधणी, शस्त्रास्त्रांचे उत्पादन, रथांची बांधणी, देवालये, प्रासाद यांची उभारणी लेण्यांचे कोरीव काम, कापड विणणे, इ. अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत. शेतीही पुष्कळ पुढारलेली होती. पशुपालनही शास्त्रीय पद्धतीने चाले. व्यापाराबद्दल तर सर्व भारतात येथल्या व्यापाऱ्यांची कीर्ती होती. ह्यांपैकी प्रत्येक विषयाचे शिक्षण दिल्यावाचून तरुण पिढीला तो उद्योग हाताळणे अशक्य होते. पण या विषयांच्या शिक्षणासाठी विद्यापीठे किंवा पाठशाळा नव्हत्या. तेव्हा हे शिक्षण पितापुत्रपरंपरेने घरीच दिले जात असले पाहिजे. काही ठिकाणच्या वर्णनांवरून कारागिरांच्याकडेही शिक्षणाची सोय होती, असे दिसते. मोठमोठ्या व्यापारी संघटना होत्या. त्याही तरुण पिढीच्या शिक्षणाची व्यवस्था करीत असल्या पाहिजेत. त्यावाचून सतत पंधराशे वर्षे हे सर्व उद्योग उत्तम पातळीवरून चालू ठेवणे शक्यच नव्हते. संस्कृत विद्येच्या पाठशाळांची वर्णने उपलब्ध आहेत तशी या शाळांची नाहीत, हे मात्र बरे वाटत नाही.
 दुसरी एक गोष्ट. घरोघरी किंवा कारागिरांच्या कारखान्यात शिक्षणाची सोय होती हे खरे. पण स्थापत्य, खाणी, नौकाबांधणी, धातुविद्या, रसायनविद्या यांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र विद्यालये सतत चालू राहिली असती तर या शास्त्रांचे तात्त्विक अध्ययन होऊन त्यात सतत प्रगती होत राहिली असती व पुढे पुढे त्यांना जे जडत्व आले ते आले नसते.

जडत्व
 हे जडत्व भारतात सातव्या आठव्या शतकापासून सर्वत्रच येत होते. डॉ. आळतेकरांनी 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथात हा विचार सविस्तर मांडला आहे. ब्रह्मगुप्त, वराहमिहिर हे फार मोठे ज्योतिष शास्त्रज्ञ होते. पण ते हळूहळू शब्दप्रामाण्यवादी होऊ लागले. ग्रहणे राहू-केतूंमुळे लागत नाहीत, पृथ्वी, चंद्र यांच्या सावलीमुळे लागतात हे त्यांना माहीत होते; तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे. पण उत्तरकाळी ते स्वतःच, पुराणांचे म्हणणे मानले पाहिजे, त्यांच्या विरुद्ध जाता येत नाही, असे सांगून राहूकेतू - सिद्धान्त मान्य करू लागले. हीच वृत्ती पुढे वाढत गेली.