पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२४०
 


संस्कृत विद्या
 वेदकाळी सर्व वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. पण पुढे हळूहळू प्रथम वैश्य आणि नंतर क्षत्रिय वेदाध्ययनाकडे दुर्लक्ष करू लागले. आणि ब्राह्मणांतही सर्वत्र ब्राह्मण वेदाध्ययन करीत, असे नाही. पण वेदविद्येची परंपरा जी काही राहिली ती ब्राह्मणांनीच संभाळली यात शंका नाही. वेदविद्या हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाई. वेद, वेदांगे, उपनिषदे, व्याकरण, ज्योतिष, मीमांसा, धर्मशास्त्र (स्मृती), पुराणे, न्याय, निरुक्त, तर्कशास्त्र, इ. विषयांचा त्यात समावेश होई. म्हणजे विद्या याचा अर्थ संस्कृत विद्या असाच झाला आणि या काळात भिन्न भिन्न संस्थांतून जे शिक्षण दिले जाई ते संस्कृत विद्येचेच होते.

व्यवस्था
 निरनिराळे मठ ही विद्याध्ययनाची मोठी संस्था त्या काळी होती. बहुतेक मठ कोठल्यातरी देवळाशी संलग्न असत. अग्रहार ही दुसरी संस्था. राजे लोक, ब्राह्मणांनी निरंतर अध्ययन अध्यापन करावे म्हणून, त्यांना गावे दान देत. त्यांना अग्रहार म्हणत. त्या गावातील जमिनीवर त्यांचा योगक्षेम चालत असे. तिसरी संस्था म्हणजे कोणा धनिकाने किंवा गावाने दाने देऊन चालविलेल्या शाळा. या तीनही संस्थांत विद्यार्थ्यांची राहण्याची व पुष्कळ ठिकाणी जेवणाखाणाची सोय केलेली असे. विद्यार्थ्यांनी शिक्षण संपल्यावर यथाशक्ती गुरुदक्षिणा द्यावी अशी पद्धत होती.
 ध्रुव राजाचे धुळ्याचे ताम्रपट आहेत. त्यांत, तेथील ब्राह्मण वेद, वेदांगे, इतिहास, पुराणे, व्याकरण, न्याय, मीमांसा व निरुक्त यांत पारंगत होते, असे वर्णन आहे. यांतील व्याकरण विषयाला त्या काळी फार महत्त्व होते. अल्बेरुणीने हे मुद्दाम नमूद करून ठेवले आहे. धारवाड जवळच्या हेब्बाळ गावी एका लेखात नमूद केलेले आहे ( इ. ९७५ ) की मुजवेश्वर देवालयात एक मठ असून त्याला दोनशे एकर जमिनीचे दान दिलेले आहे. या उत्पन्नातून गुरुजींचा व शिष्यगणाचाही खर्च चालत असे. मनगोला व बळगावे या दोन गावी दोन लेख ११६१ व ११८३ या सालचे सापडले आहेत. या दोन्ही खेड्यांत संस्कृतशाळा होत्या. बळगावे येथे दक्षिणेश्वराच्या मंदिरात ही शाळा होती. आणि देवळाचे अधिकारी गावातून दाने जमा करून शाळेचा खर्च चालवीत असत. कान्हेरीला एक बौद्ध विहार होता. राजा अमोघवर्षाच्या काळात कोणी भद्रविष्णू धनिक होता. त्याने या विहाराला देणगी दिली होती. त्यातील काही भाग ग्रंथ विकत घेण्यासाठी खर्चावा, असे दानपत्रात सांगितले आहे. कान्हेरीला त्याप्रमाणे ग्रंथालय केलेलेही होते. धारवाड जिल्ह्यातील कळस हे गाव अग्रहार होते. तेथे एक संस्कृत विद्यालय होते. तेथील लेखात म्हटले आहे की तेथील दोनशे ब्राह्मण व्याकरण, राजनीती, साहित्यशास्त्र, तर्कशास्त्र, टीका यांत पारंगत होते. राष्ट्रकूट राजा